सावधान! लोकलवर फुगे माराल, तर तुरुंगात जाल

मुंबई- धुळवडीच्या दिवशी लोकलवर फुगे मारणा-या महाभागांमुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास होतो. अनेकांना जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यंदा मात्र गव्हर्मेट रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) कंबर कसली असून लोकलवर फुगे मारणा-यांना थेट तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था केली आहे. रेल्वे रुळांलगत ‘जीआरपी’चे पथक गस्त घालणार असून, रेल्वे रुळांलगतच्या झोपडपट्टय़ांमध्ये याबाबत जनजागृतीही करणार आहे. मुंबईची लाइफ लाइन म्हणून रेल्वेची आेळख आहे. सुमारे ७० लाख प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांना योग्य सुविधा देत त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. मात्र हल्ली रेल्वेस्थानक अथवा लोकलमध्ये महिलांच्या छेडछाडीचेही प्रकार वाढले आहेत. त्यातच धुळवडीच्या दिवशी अपायकारक रंगांचे फुगे मारण्याचे प्रकार काही महाभाग करतात. 

विशेषकरून महिला प्रवाशांना धुळवडीच्या दिवशी टार्गेट केले जाते. रेल्वे रुळांलगतच्या झोपडपट्टय़ांचा आडोसा घेत लोकलवर फुगे मारले जातात. धावत्या लोकलवर फुगा मारल्याने दरवाजात उभ्या असणा-या प्रवाशांचा तोल सुटून अपघात झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे धुळवडीच्या दोन दिवस आधीपासूनच जीआरपी रुळालगत गस्त सुरू करणार आहेत. रेल्वे प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर धुळवडीच्या दिवशी जीआरपी पोलिसांची करडी नजर राहणार आहे.