मुंबई- लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवण्याची दिवास्वप्ने पाहत देशव्यापी दौरा करणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल बुधवारी मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी मुंबईतही त्यांच्या उपद्रवमूल्याची प्रचिती दिली. प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरी जगावेगळे करण्याचा त्यांचा दुराग्रह सर्वसामान्यांना किती त्रासदायक होतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव मुंबईकरांना आला. केजरीवाल यांच्या मुंबईतल्या ‘सर्कस’मुळे मुंबईकरांनी ऐन गर्दीच्या वेळीच आपचा ताप अनुभवला. विमानतळापासून, ते अंधेरी-चर्चगेट लोकल प्रवासापर्यंत आम आदमी पक्षाने ‘आम आदमी’लाच वेठीस धरल्याचे चित्र होते.
अरविंद केजरीवाल सकाळी साडेदहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानाने मुंबई गाठणा-या केजरीवाल यांनी अंधेरी रेल्वेस्थानकाकडे येण्यासाठी चक्क रिक्षा पकडत सर्वसामान्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न त्यांच्याच अंगाशी आला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी या प्रवासादरम्यान सर्व नियम धाब्यावर बसवले. एका रिक्षात पाच-पाच जण बसून, प्रसंगी रिक्षाबाहेर लटकून या कार्यकर्त्यांनी प्रवास केला. अनेक ठिकाणी सिग्नलही तोडले. केजरीवालांच्या ताफ्यातील मोटरसायकलस्वार तर हेल्मेटविनाच होते. या सगळ्या गोंधळामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची भयंकर कोंडी झाली होती. त्यानंतर केजरीवाल हे अंधेरी स्थानकात अवतरल्यावर तर एकच गोंधळ उडाला. ऐन गर्दीच्या वेळी ‘आप’चे कार्यकर्ते अंधेरी स्थानकात आल्याने ख-या-खु-या ‘आम आदमी’साठी जणू रेल्वेचे दरवाजे बंदच झाले. जी लोकल चर्चगेटला जाणार होती तिच्या पहिल्या पाच डब्यांवर कार्यकर्त्यांनीच कब्जा केला.
कार्यकर्ते लोकलला सर्रास लटकत होते. ही लोकल चर्चगेटला पोहोचल्यावरही या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी थांबली नाही. यातील अनेकांनी तर तिकिटही काढले नव्हते. त्यांनी केजरीवाल यांना लोकलमधून उतरता यावे यासाठी लोकलची साखळी खेचली. त्यानंतर त्यांना स्थानकाबाहेर विनाविलंब जाता यावे यासाठी स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरही कार्यकर्त्यांनी पाडून-तोडून टाकले. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. केजरीवाल यांच्या या पब्लिसिटी स्टंटमुळे तर आम आदमी पार्टी विरुद्ध ‘आम आदमी’ असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे केजरीवाल यांचा हा दौरा म्हणजे डोक्याला नसता ताप अशीच टीका दिवसभर विविध स्तरांतील मुंबईकरांकडून सुरू होती. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या रिक्षा दौ-याचा फटका तीन स्थानिक रिक्षावाल्यांना बसला.
विमानतळापासून अंधेरीपर्यंतच्या रिक्षा प्रवासात तीन रिक्षांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्यामुळे वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ अंतर्गत या रिक्षावाल्यांवर कारवाई केली आहे. या तीन रिक्षा चालकांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त(वाहतूक) प्रताप दिघावकर यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल केवळ राजकारण करत आहेत. ते जनतेची फसवणूक करत आहेत. पब्लिसिटी स्टंट करण्यात ते हुशार आहेत, असे सांगत त्यांच्या या राजकारणाचा निषेध करणा-या काही तरुणांनी त्यांना चर्चगेट स्थानकातच काळे झेंडे दाखवले.