ममतांची फसलेली रामलीला

आपण देशाचा पंतप्रधान व्हावे म्हणून शरद पवार, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार इत्यादी नेते त्या खुर्चीवर नजर खिळवून बसले आहेत. ही स्पर्धा कमी झाली म्हणून की काय मायावती आणि जयललिता यांनीही पदर खोचले होते. या स्पर्धेत ममता बॅनर्जी अजून उतरलेल्या नव्हत्या परंतु या मैदानात जरा कमीच भिडू उतरले आहेत असे वैषम्य अण्णा हजारे यांना वाटायला लागले आणि अण्णांनी ममता बॅनर्जींना या मैदानात उडी घ्यायला सांगितले आणि त्यामुळे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत ममतांची भर पडली आणि त्यांनी काल थेट दिल्लीवर हल्ला केला. पण हा हल्ला एवढा फसला की त्यांना आता या स्पर्धेत उतरल्याचा पश्‍चात्ताप होत असेल. कारण त्यांना आधी या साठी अण्णांनी भरीला घातले आणि हळूच आपला पाठींबा काढून घेतला. अण्णांच्या लहरीपणाचा फटका आजवर अनेकांना बसला आहे आत अशा नेत्यांच्या यादीत ममता बॅनर्जी या नावाची भर पडली आहे. ममता बॅनर्जी यांना अण्णांचा पाठींबा नीट वापरता आला नाही. कारण ते सुद्धा एक तंत्र आहे. किंबहुना आजची निवडणूक हीच तंत्राधारित झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडवून देण्याचे तंत्र जो जाणतो तोच निवडून येऊ शकतो असे आजचे चित्र आहे. ममता बॅनर्जी यांनी डाव्या आघाडीला पराभूत करण्यासाठी जे तंत्र वापरले ते तंत्र पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी काही उपयोगाचे नाही हे काल त्यांना लक्षात आले.

तत्व, विचार, राष्ट्रवाद आणि जनकल्याण यांचा या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. ज्या जनतेचे कल्याण व्हावे अशी अपेक्षा असते ती जनताच आपल्या कल्याणाबाबत उदासीन आहे. निवडणुकीचे आणि प्रचाराचे तंत्र योग्य पद्धतीने राबवून जो कोणी प्रचार करील आणि लोकांना भुरळ घालून भरपूर मते मिळवील तोच आता विजयी होत आहे. भारतीय जनता पार्टीने या तंत्रात कॉंग्रेसवर मात केली आहे, कारण या तंत्राच्या प्रत्येक अंगात भाजपाचे नेते आघाडीवर आहेत. जाहीर सभांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि प्रत्येक सभा मोठीच होईल अशी योजना करणे हा या तंत्राचा एक भाग असतो. नरेंद्र मोदी यांच्या सभा नेमक्या कोठे घ्याव्यात आणि कशा घ्याव्यात याची व्यवस्थित आणखी भाजपाचे नेते करत असतात. देशाच्या विविध भागात सभा आयोजित करणे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती सभा मोठीच करणे हा तंत्राचाच भाग असतो. सभा प्रचंड झाली की, नेता लोकप्रिय आहे हे लोकांच्या मनावर ठसवता येते आणि एकदा ते लोकांच्या मनावर ठसले की, लोक स्वत:हूनच सभेला गर्दी करायला लागतात आणि सभेला गर्दी व्हायला लागली की, नेता आपोआपच लोकप्रिय व्हायला सुद्धा लागतो. तेव्हा सभांचे नियोजन हा निवडणूक जिंकण्यातला माेठा भाग असतो.

ममता बॅनर्जी यांना तसे नियोजन करता आले नाही आणि त्यामुळे काल त्यांची दिल्लीवरची स्वारी अपयशी ठरली. खरे म्हणजे त्यांना अण्णा हजारे यांनी हूल दिली, म्हणून त्या दिल्लीला निघाल्या. अन्यथा त्यांचे लक्ष आपल्या राज्याकडेच होते. कधीकाळी दिल्लीमध्ये वर्चस्व असलेल्या ममता बॅनर्जी पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद खुणवायला लागताच दिल्ली सोडून कोलकत्याला आल्या होत्या. परंतु अण्णा हजारेंनी त्या पंतप्रधान होऊ शकतात असे त्यांच्या मनात भरवले. ममता बॅनर्जी असोत की अन्य कोणी असोत असे धूर्त राजकीय नेते कोणीतरी हूल दिली म्हणून पाघळत नसतात. पण अण्णा हजारे यांच्यासारखा दिगंत कीर्तीचा माणूस आपल्या मागे उभा रहात आहे असे दिसायला लागताच ममता बॅनर्जी पाघळल्या. पश्‍चिम बंगालमधील १८ खासदार त्यांच्या हातात आहेत, ती त्यांची मर्यादा आहे. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून जे ढिसाळ प्रशासन प्रदान केले आहे त्यामुळे त्यांचे १८ खासदार यावेळी पुन्हा निवडून येतील की नाही याविषयी शंका वाटत आहेत. पण तरी सुद्धा पाघळलेल्या ममता बॅनर्जींनी पंतप्रधानपदाची स्वप्ने बघायला सुरुवात केली.

पश्‍चिम बंगालच्या बाहेर सुद्धा आपले वर्चस्व वाढवून १०० खासदार निवडून आणण्याची योजना त्यांनी आखली. आता अशा रितीने कितीही स्वप्ने पाहिली तरी बेडकाचा बैल होत नसतो हे ममता बॅनर्जींना सांगणार कोण? सत्ता आणि खुशमस्करे यांचे काय नाते असते हे माहीत नाही. मात्र एकदा खुशमस्कर्‍यांचा गराडा पडला की, नेते हवेत तरंगायला लागतात. ममता बॅनर्जी त्याला अपवाद कशा असतील. त्यांनी दिल्लीत प्रचंड सभा आयोजित करून १०० खासदारांच्या योजनेचा नारळ फोडायचे ठरवले. परंतु दिल्लीतली ही सभा त्यांना नीट आयोजित करता आली नाही. परिणामी सभेची शोकांतिका झाली. सभा छोटी असल्यामुळे आणि तिला केवळ दोन हजार लोक हजर असल्यामुळे अण्णा हजारे यांनी त्या सभेला येणे टाळले. त्यामुळे तर सभेची जानच गेली. ममता बॅनर्जी वैतागल्या. वैताग आला तरीही संयम राखायचा असतो, पण ममता बॅनर्जी यांना तेच तंत्र अवगत नाही. त्यामुळे सभा किरकोळ होण्याने त्यांनी गमावलेली प्रतिष्ठा वैतागवाणे भाषण करून आणखी गमावली. त्यांनी अण्णांचे नाव न घेता त्यांच्या नावाने बोटे मोडली. परंतु पंतप्रधानपद प्राप्त करण्यासाठी त्यांनी सुरू केलेली यात्रा अशी फसली. एकंदरीत पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला एक भिडू याेजना सुरू होण्याच्या आधीच गारद झाला.

Leave a Comment