पुण्यातील तीन मतदारसंघात मॅच फिक्सींग !

पुणे – पुण्यात पुणे शहर, शिरूर, बारामती आणि मावळ असे चार लोकसभेचे मतदारसंघ येतात. यापौकी बारामती, मावळ आणि शिरूर या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवर नजर टाकली की त्यात मॅच फिक्सींग झाले आहे की काय असा संशय येण्याची परिस्थिती आज दिसत आहे.

बारमती लोकसभा मतदारसंघ हा युतीत भाजपच्याकडे आहे. या मतदारसंघातून सेनेचे आमदार विजय शिवतरे इच्छुक होते. तशी त्यांनी तयारी अन संपर्क भाजपच्या नेत्यांशी अन उध्दव ठाकरे यांच्याशीही केला होता.पण युतीच्या वाटपात बदल नाही असे सांगत त्यांची बोळवण केली. आमदारांनीच बारामतीत मॅच फिक्सींग असल्याचा आरोप मिडियात केलेला आहे. भाजपने त्यांच्या कोट्यातील हाच मतदारसंघ महादेव जानकर यांना देऊन टाकला. आता तेथे ना सेनेचा उमेदवार असेल ना केंद्रातील सत्तेची स्वन्प बघणा-या भाजपचा. त्यामुळे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना लढत काहीशी सोपी झाली असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे दिलीप वळसेपाटील यांना उतरवण्याचा चंग मागच्या निवडणुकीपासून अजित पवारानी बांधला होता. पण दोन्हीवेळेस त्यांना त्यात यश आले नाही. वळसे यांनी नकार देताच दुस-या उमेदवाराच शोध सुरू झाले अन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांना देवदत्त निकम यांना अढळराव पाटील यांच्या समोर लढण्यासाठी उभे करण्यात आले आहे. या देवदत्त निकम यांचे नावही कधी कोणत्या कार्यक्रमात आतापर्यंत पाहुणे किंवा व्यासपीठावरील मान्यवरांच्यात वाचायला मिळालेले नाही त्यांना खासदारकीचे तिकीट दिल्याबद्दल मतदारच आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्यात मागच्यावेळी शिरूर मतदारसंघात खासदार सेनेच अन आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. त्यामुळे हे उघडउघड फिक्सींग असल्याचे दिसते.

मावळ मतदारसंघात गजानन बाबर या विद्यमान खासदारांचे तिकीट कापून तीनवर्षापूर्वी सेनेत आलेल्या श्रीरंग बारणे यांना दिले. त्यात बारणे हे विधानसभेच्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्याकडूनच पराभूत झाले आहेत.हा त्यांचा इतिहास आहे अन इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. त्यात शेकापने जगताप यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांची घाटाखाली मदत यावेळी बारणे यांना मिळणार नाही हेही उघड झाले आहे. त्यात जगताप हे राष्ट्रवादीची उमेदवारी घेत असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. पवारांनी त्यासाठी दबाव आणल्याचे सांगण्यात येत असल्याने हे सुद्धा फिक्सींग असण्याची शंका येते.

Leave a Comment