निवडणुकीच्या तोंडावर शिमगा

भाजपा आणि शिवसेना युतीमध्ये शिमग्याच्या तोंडावर  जी शब्दांची देवाणघेवाण सुरु आहे ती ऐकून लोकांची करमणूक होत आहे आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गालातल्या गालात हसत आहेत. शिमगा आणि रंगपंचमी  हे राजकीय पक्षांचे आवडते सण आहेत. शिवीगाळ, उखाण्यांची देवाणघेवाण आणि परस्परांवर रंगांची उधळण करणे या कामात त्यांना विशेष रस असतो. कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, नेता कोणत्याही आघाडीचा असो त्याला एकदा शिवीगाळीची आणि रंग टाकण्याची लहर आली की आपण कोणावर रंग टाकतो याचे भान राहत नाही. मग युतीतले दोन पक्ष आणि एका पक्षातले दोन गट  परस्परांना अडूनअडून टोमणे मारायला लागतात. सध्या महाराष्ट्रात हाच उद्योग चाललेला आहे. पवार आणि चव्हाण हे भाजपा-सेनेच्या गडाचे एकेक चिरे कसे खिळखिळे करता येतील यासाठी आपली शक्ती पणाला लावत असतातच. कारण एकदा ही युती आणि त्यांनी केलेली महायुती यांच्यामध्ये लाथाळ्या सुरु झाल्या की त्यांच्यात मतविभागणी होईल आणि आपला फायदा होईल हे त्यांना माहीत आहे. 

खरे म्हणजे आता युतीतल्या दोन पक्षात आणि दोन्ही पक्षातल्या आतल्या गटात एवढी धुसफूस चाललेली आहे की गडाचे बुरुज खिळखिळे करण्यासाठी पवार आणि चव्हाणांना फारसे काही करण्याची गरजच पडणार नाही. हे बुरुज खिळखिळे करण्याकरिता भुयार खोदून त्यात बारुद भरून बत्ती द्यायला  पवार-चव्हाण हातात काड्याची डबी घेऊन थांबलेलेच आहेत. पण शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर लाथा झाडणारे नेते त्यांना एक दिलासा देत आहेत. आमचा बुरुज खिळखिळा करण्यासाठी तुम्ही काही फार तसदी घेऊ नका हे बुरुज भुसभुशीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत असा संदेश हे गडकरी आणि  राडेकरी त्यांना देत आहेत. गडकर्‍यांनी गड राखण्याच्या ऐवजी तो पवारांच्या दावणीला बांधण्याकरिता पवारांचे कट्टर शत्रू गोपीनाथ मुंडे यांच्या महायुतीच्या डावाला मनसे डाव टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एकवेळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा फायदा झाला तरी चालेल परंतु महायुतीचा विजय होऊन मुंडेंची मस्ती वाढता कामा नये अशी प्रतिज्ञा करून हे वैदर्भीय गडकरी मुंडेंच्या बुरुजाला स्वतःच सुरुंग लावत आहेत. मराठी माणसाची ही खासियतच आहे. एकवेळ  परक्या माणसाचा फायदा झाला तरी चालेल पण माझ्या माणसाचा अपमान झाला पाहिजे आणि त्यातून मला आनंद मिळाला पाहिजे हीच त्याची भावना असते. 

आज गडकरी  त्याच हेतूने कामाला लागले आहेत. अर्थात, ही गोष्ट काही एका रात्रीतून झालेली नाही. मुंडे म्हणजेसुध्दा प्रभू रामचंद्राचा अवतार नाही. त्यांनी माणसाला जवळ करून नंतर लाथ घालून दूर करण्याचा पवार पॅटर्न त्यांच्यापेक्षाही प्रभावीपणे राबविलेला आहे. त्यामुळे मुंडे यांच्या विरोधात नेहमी त्यांच्या पासून दूर गेलेला त्यांचाच माणूस उभा असतो. गोपीनाथ मुंडे यांच्या आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांचा विचार केल्यास हेच लक्षात येईल आज त्यांच्या विरोधात उभे असलेले सुरेश धस आणि २००९ साली उभे असलेले जयसिंग गायकवाड हे त्यांचे एकेकाळचे एवढे घनिष्ट मित्र होते की ते एका ताटात जेवत असत. पण तेच पुढे त्यांचे प्रतिस्पर्धी झाले. परळी विधानसभा मतदारसंघात सुध्दा त्यांनीच बोट धरून राजकारणात आणलेले त्यांचेच सहकारी त्यांच्या विरोधात उभे असलेले दिसतात. म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे राजकारणसुध्दा आत्मघातकी ठरलेले आहे. त्याच राजकारणाच्या बाजाने कधी तरी गडकरी यांची कळ काढलेली असणार त्याशिवाय गडकरी त्यांना अशा गुदगुल्या करणार नाहीत. त्यांचे हे विळ्याभोपळ्याचे सख्य  आज निवडणुकीच्या तोंडावर वेगळ्या स्वरूपात पुढे येत आहे आणि एकीने पक्ष चालवण्याची परंपरा असलेल्या भाजपामध्ये अंतर्गत दुफळीचे दर्शन होत आहे. 

निवडणुका अगदी तोंडावर आल्या तरी शिवसेनेची समजूत अजून पटलेली नाही आणि सामनामधून उध्दव ठाकरे याही मोक्यावर  भाजपाच्या नेत्यांच्या डोक्यात धोंडे पडतील असे भाकीत करून त्यांच्या डोक्याला टेंगळे आणायला लागले आहेत.  उध्दव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये भाजपाला काही प्रश्‍नही केले आहेत आणि भाजपाने आपल्यातले स्पीड ब्रेकर काढून टाकावेत असा उपदेश केला आहे. उध्दव ठाकरे यांना स्पीड ब्रेकर शब्द का आठवला माहीत नाही. पण त्यांना हाच शब्द दहा वर्षापूर्वी नीट आठवला असता तर त्यांना आपल्या पक्षातले स्पीड ब्रेकर काढून टाकण्याची सद्बुध्दी सुचली असती आणि नारायण राणे, राज ठाकरे हे अजुनही शिवसेनेतच राहून मातोश्रीवर  मुजर्‍याचे रतीब घालत राहिले असते. पण उध्दव ठाकरेंना  एवढी उदंड चर्चा होऊन सुध्दा आपल्यातला आणि कार्यकर्त्यातला मिलिंद नार्वेकर नावाचा एक स्पीड ब्रेकर का हटवता आलेला नाही हाही एक प्रश्‍नच आहे. या स्पीड ब्रेकरमुळे शिवसेनेला किती अपघात झाले आणि शिवसेनेच्या किती गाड्या उलटून पडल्या याचा विचार उध्दव ठाकरे यांनी केला पाहिजे. नितीन गडकरी यांची राजनीती हा त्यांना डाचणारा प्रकार ठरला आहे. ही गोष्ट खरी आहे. परंतु राज ठाकरे यांच्याशी सहकार्य करायचेच नाही असा आग्रह भाजपासमोर धरू शकतात का असा सवाल त्यांना सुधीर मुनगुंटीवार यांनी विचारला आहे तो योग्यच आहे. एका बाजूला युती करून मागच्या दाराने राज ठाकरे यांची मनधरणी करणे हे उध्दव ठाकरे यांना अनीतीचे वाटते पण त्यांनी स्वतःच ठाणे महापालिकेत मनसेचे सहकार्य घेतलेले आहे याचा त्यांना कसा विसर पडतो? आपल्या अशा कृत्यांचा विचार करून उध्दव ठाकरे यांनी कमळाबाईच्या डोक्यात धोंडे मारणे थोडे कमी केले पाहिजे.

Leave a Comment