गोपीनाथ मुंडेंची पक्ष बैठकीला दांडी

मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते व महायुतीचे शिल्पकार गोपीनाथ मुंडे पुन्हा एकदा नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज पक्षाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती त्याला मुंडे यांनी दांडी मारली. तसेच तीन दिवसापूर्वी राज प्रकरणानंतर उदभवलेल्या संकटानंतर प्रदेश भाजपची बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र त्यावेळीही आपण मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागात शेतक-यांची भेट घेतल्याचे सांगत बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. मागील आठवडाभर भाजपमध्ये खूपच अंतर्गत घडामोडी घडल्या आहेत. राज – नितीन गडकरींच्या भेटीनंतर पक्षाला व पर्यायाने मला अडचणीत आणण्यात येत असल्याची भावना त्यांच्या मनात असल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर पुण्यासह मुंबईतील लोकसभा जागा वाटपात आपले म्हणणे ऐकत नसल्याने नाराज असल्याचेही कळते. 

उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये नेमके कोणाला अधिकार आहेत, असा प्रश्न विचारल्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी महाराष्ट्रातील सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस यांना असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नेमक्या कोणत्या बाबीमुळे मुंडे नाराज आहेत याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे म्हटले आहे. जागा वाटपावरून तर आपण कोणावरही नाराज नाही. लोकसभा तिकीट कोणाला द्यायचे हा दिल्लीतील नेत्यांचा विषय आहे, असे सांगत यावरून नाराज होण्याचा प्रश्नच नाही असे मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Leave a Comment