पुणे – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा आजचा पुणे दौरा अचानक रद्द करण्यात आला असल्याचे समजते. ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांचे एकेकाळी शिष्य असलेले केजरीवाल यांनी अण्णांची पुण्यातील लोकप्रियता लक्षात घेऊन हा दौरा रद्द केला असल्याची चर्चा केली जात आहे. अण्णा गेले कांही दिवस सातत्याने केजरीवाल यांच्यावर टीका करत आहेत.
आम आदमी पक्षाने पुण्यात केजरीवाल यांची १२ मार्च रोजी पुण्यास सभा आणि मावळ पुणे भागात त्यांचे रोड शो आयोजित केले होते. या दौर्यासाठीची सर्व तयारीही पूर्ण झाली होती मात्र अचानकच हा दौरा रद्द करण्यात आला. त्याऐवजी केजरीवाल आता गारपीटग्रस्त विदर्भाचा दौरा करणार असल्याचे समजते. पक्षाचे पुण्यात केजरीवाल यांची सभा होण्यासाठीचे प्रयत्न सुरूच असून कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होऊ शकेल असे समजते. अण्णांनी केजरीवाल यांच्यावर उठविलेली टीकेची झोड त्यांचा आजचा कार्यक्रम रद्द होण्यास कारणीभूत ठरली असल्याचेही सांगितले जात आहे.