जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार तीन भारतीयांना

जर्मनीचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार तीन भारतीयांना जाहीर झाला असून जर्मनी भारत यांच्यातील संबंध वाढविण्यासाठी या तिघांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना दिला जात असल्याचे जर्मनीचे भारतातील राजदूत मायकेल स्टेनर यांनी सांगितले. आनंदसिंग बावा, कल्याण सचदेव आणि प्रो. सईद हसनेन अशी पुरस्कार विजेत्यांची नांवे आहेत. एकाचवेळी तीन भारतीयांना हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

स्टेनर यांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदसिंग बावा हे फेडरेशन ऑफ इंडो जर्मन सोसायटी इन इंडियाचे सचिव आहेत. त्यांनी जर्मन पुस्तके भारतीय भाषांत भाषांतरीत करून भारतात विकण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. कल्याण सचदेव हे गुरगांव येथील खासगी रूग्णालयाचे संस्थापक व मेडिकल डायरेक्टर आहेत. त्यांनी १९७५ पासून जर्मन दूतावासात डॉक्टर म्हणून काम पाहिले आहे आणि जर्मन पेशंटसाठी त्यांचे रूग्णालय हे जणू दुसरे घरच आहे. जर्मन डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे कामही ते करतात.

प्रो. हसनेन हे सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञ आणि संशोधक असून त्यांनी क्षय रोगावर विशेष संशोधन केले आहे. त्यांना यापूर्व अलेक्झांडर हमबोल्ड अॅवॉर्डही मिळाले असून हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय संशोधक आहेत. जर्मन संशोधकांना भारतात संशोधन करता यावे यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.