पहिल्या टप्प्यात महायुतीची आघाडी पण ‘दिल्ली बहोत दूर’

सोळाव्या लोकसभा निवडणुकीचे रिंगण अजून स्पष्ट झालेले नाही. दररोज नवीन घटना घडत आहेत. जोपर्यंत शेवटची यादी हाती लागत नाही तोपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे. तरीही कॉग्रेसआघाडीला पश्चिम महाराष्ट्रातील निवडणूक पूर्वीसारखी सोपी राहिलेली नाही. हातकणंगले मतदारसंघातील राष्ट्रवादीचा दावा त्या पक्षाने सोडून द्यावा, हे त्याचेच एक लक्षण आहे. पश्चिम महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या काँगे्रेसचे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील बाळासाहेब देसाई यांनी सांभाळलेला आहे. नव्या पिढीत शरदराव पवार, जयंत पाटील, पतंगराव कदम अशा लोकांनी सांभाळलेला आहे. सध्या मुख्यमंत्रीपद याच भागात आहे. एवढेच नव्हे तर अन्य भागातील मुख्यमंत्र्यांनी कारभार नीट केला नाही म्हणून या भागातील केंद्रीय मंत्र्यांना येथे मुख्यमंत्री म्हणून यावे लागले, अशी वस्तुस्थिती सर्वांना मान्य आहे. पहिल्या टप्प्यात आघाडीचे बरेच उमेद्वार स्पष्ट झाले आहेत त्यामुळे आघाडीचे पारडे जड वाटते आहे पण हळूहळू अन्य उमेदवार जाहीर होतील त्यानुसार लढतीचे खरे स्वरूप पुढे येत आहे

पुणे जिल्ह्यात साडेतीन मतदारसंघात साडेतीन पैकी दोन खासदार आज सेनेचेच आहेत. बारामती हा साहेबांच्या प्रतिष्ठेचा मतदारसंघ मानला तरी तेथे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. तरीही अशा ठिकाणीही साहेबांची ताकद काय ती दिसणार आहे. पुणे मतदारसंघात गेली 33 वर्षे खासदार असलेले सुरेश कलमाडी हे विद्यमान खासदार आहेत. त्यांची तिहार जेलमध्ये दहा महिने राहल्याची पार्श्वभूमी आज नवी नाही. पण त्यांनी पुण्याची जागा मला दिली नाही तर तुम्हालाही मिळू देणार नाही, असा काँग्रेसशी पंगा घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या सुविद्य पत्नी मीराबाई यांना तिकीट देवून मार्ग काढू असा पर्याय पुढे आला आहे. पण कलमाडी हे यावेळी देशातील निवडणूक प्रचारात भ्रष्टाचाराचे उदाहरण देण्यासारखे नाव असल्याने ते तर निवडून येणारच नाहीत पण त्यांच्या पत्नी किंवा काँग्रेसने कोणीही उमेदवार दिला तरी मतदार त्यांना पसंती देतील असे वातावरण नाही. सध्या पतंराव कदम यांचे चिरंजीव व युवक काँग्रेसचे उध्यक्ष विश्वजित कदम यांचे नाव चर्चेत आहे पण काँग्रेसची येथील विद्यमान परिस्थिती लक्षात घेता कदम यांना यश मिळेल, असे वाटत नाही. भाजपाकडूनही अजून उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत आहे. पण ते नाव या दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता दिसते आहे. गेल्या वेळी भाजपाचे उमेद्वार अनिल शिरोळे हे कलमाडी यांच्या पेक्षा अवघी एकवीस हजार मते कमी पडून जागा हरली होती. यावेळी तेवढी मते जाण्याची काळजी कलमाडी यांनीच घेतली आहे. रविवारी पुण्यासाठी मनसेने दीपक पायगुडे यांचे नाव जाहीर केले आहे. वास्तविक पुण्याची जागा मनसेला कठीण आहे तरी त्यांना यावेळी शक्तीप्रदर्शन येवढेच त्यात उद्दिष्ट दिसते आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पक्षांतरे यावेळी या भागाचे वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरली आहेत. त्यातील एक म्हणजे कोल्हापुरातील प्रा संजय मंडलीक यांचा सेनाप्रवेश व राष्ट्रवादीचे संजयकाका पाटील यांचा भाजपाप्रवेश. वास्तविक गेल्या आठवड्यापर्यंत मंडलीक यांचे कट्टरविरोधक धनंजय महाडिक यांच्या सेनेप्रवेशाच्या बातम्या येत होत्या पण ते पक्षांतर रोखण्यास राष्ट्रवादीने यश मिळवले. पण त्याचा परिणाम असा झाला की, या भागातील ज्येष्ठ राजकारणी सदाशिव मंडलीक यांचे चिरंजीव प्रा. संजय मंडलीक यांचा सेनाप्रवेश झाला. मंडलीक घराण्याची गेल्या पंधरा वर्षातील वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांचे स्वत:चे काम व सामाजिक वातावरण यातून ते जातील तेथे स्वत:ची दोन लाख मते घेवून जावू शकतात. तेथील धोबीपछाड राजकारणात स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी सदाशिव मंडलीक यांना वारंवार आपल्या दोन लाख मतदारासह अनेक पक्षात व स्वतंत्र निवडणूक लढवून आपला यशस्वी परिचय कायम ठेवला आहे. यावेळी ङ्गरक येवढाच आहे की, त्यांनी पुढच्या पिढीसाठी जागा निर्माण करून ठेवली आहे.

तेथील जिल्हापरिषद राजकारणातील प्रा. संजय मंडलीक हे यशस्वी राजकारणी आहे. राजू शेट्टी यांचा मंडलीक कुटुंबाला गेल्यावेळीही चांगला उपयोग झाला आहे आणि शेट्टी यांनाही उपयोग झाला आहे. गेल्या आठवड्यात प्रा मंडलीक यांच्या सेनेत प्रवेश करण्याच्या सोहोळ्यात प्रा शेट्टी यांचा पुढाकार होता. राजू शेट्टी हे स्वत: हातकणंगले या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवडणूक लढवत आहेत व स्वाभिमानी शेतकरी संघटना याही वेळी महायुतीचा भाग आहे. प्रा मंडलीक यांचा सेना प्रवेश राजू शेट्टीना तर उपयोगी पडणार आहे व शेट्टी यांचे आंदोलनही प्रा. मंडलीक यांना उपयोगी पडणार आहे. जे महत्व संजय मंडलीक यांच्या महायुतीतील सेनाप्रवेशाचे तेच महत्व सांगलीतील राष्ट्रवादीतील आमदार संजयकाका पाटील यांच्या भाजपाप्रवेशाचे आहे. संजयकाका पाटील यांची तक्रार अशी होती की, गृहमंत्री आर आर आबा हे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी स्थिती निर्माण करतात. बाकीचे नेतेही असेच वागतात त्यामुळे त्यांना काम करणे अशक्य झाले आहे. गेल्या दहा वर्षात सांगली जिल्ह्यात अनेक आंदोलनाच्या माध्यमातून महायुतीने चंागले वातावरण निर्माण केले आहे. जाणकारांच्या मते या दोन घटनांनी या भागातील वातावरणच बदलले आहे. गेले वर्षभर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर राजू शेट्टी यांचा प्रभाव असला तरी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्लाप्पा अण्णा आवाडे उभे राहणार आहेत. त्यामुळे ही लढत सोपी राहिलेली नाही.

पहिल्या टप्प्यात महायुतीने उमेद्वार उभे करण्यात व प्रचारातील मुद्द्याची जमवाजमव करण्यात जरी आघाडी घेतली असली तरी अजून ‘दिल्ली बहोत दूर है’ येवढेच म्हणता येईल.

Leave a Comment