पवारांचा आदेश धुडकावू, पण राणेंना मदत करणार नाही!

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघांत काँगे्रस, राष्‍ट्रवादीमधील कार्यकर्त्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे राष्‍ट्रवादीला कायम अपमानास्पद वागणूक देत असल्यामुळे त्यांचे पुत्र नीलेश राणे यांना मतदान न करण्याचा निर्णय संतप्त राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यासाठी प्रसंगी शरद पवार यांचाही आदेश मानणार नसल्याचे या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत राष्‍ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांना कस्पटासमान वागणूक सातत्याने दिली गेली. तसेच सिंधुदुर्गमध्ये राष्‍ट्रवादी अस्तिवातच नाही, जे काही आहे ते फक्त काँगे्रसच, अशी राणे पितापुत्रांची वागणूक असते, त्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. त्यामुळे या ठिकाणी काँगे्रसला साथ देण्यापेक्षा राज्यातील राष्‍ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराला आम्ही जाऊ’, असे ठराव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्‍ट्रवादीच्या सर्व तालुका कार्यकारिणीने केले आहेत. त्याला जिल्हा कार्यकारिणीनेही मंजुरी दिली आहे.

सिंधुदुर्ग राष्‍ट्रवादी काँगे्रेसचे प्रवक्ते नितीन वाळके तसेच तालुकाध्यक्ष राजा गावकर यांनी आपल्या पक्षात खदखदत असलेल्या राणेंविरोधातील राग प्रसार माध्यमांसमोर मांडला आहे. ‘सहकार्य सोडाच, पण गेली पाच वर्षे आम्हाला त्रासच झाला. आमच्या कार्यकर्त्यांच्या व्यथा वरिष्ठ नेत्यांच्या कानावरही घालण्यात आल्या. पण तिकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला कोणी वालीच नसेल तर आमचे निर्णय घ्यायला आम्ही मोकळे आहोत’, अशी व्यथा राष्‍ट्रवादी जिल्हा कार्यकारिणीने मांडली.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्‍ट्रवादीच्या वेंगुर्ला तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मध्यंतरी बैठक झाली. गेली पाच वर्षे काँग्रेसचे खासदार नीलेश राणेंनी आपल्याला हिंग लावून विचारले नसेल, तर आता त्यांना मदत कशाला करायची. त्यापेक्षा बारामतीत जाऊन सुप्रिया सुळे यांचा प्रचार करू, अशी भूमिका राष्‍ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसमधील वाद चांगलाच उफाळून आला आहे.

नगरविकास राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरी व सिंधुदुर्गचे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांची बंद दरवाजाआड भेट घेतली, असा आरोप नीलेश राणेंनी केला आहे. या भेटीचा तपशील उघड व्हायला हवा, अशी मागणीही राणेंनी पत्रकार परिषदेत केली. 2009 च्या निवडणुकीत रत्नागिरीत फटका बसून नीलेश राणे पडणार अशी स्थिती होती. मात्र, शेवटच्या क्षणी सामंत यांनी मदतीचा हात दिल्याने राणेंचा पराभव टळला. आता तेच सामंत राणेंविरोधात का उलटले, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

Leave a Comment