केजरीवालची पुण्यात १२ मार्च रोजी सभा

पुणे – आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची पुण्याात १२ मार्चला सभा होणार आहे. अण्णा हजारे यांच्या ‘बालेकिल्ल्या’त येऊन ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी राजकीय पक्षांपेक्षाही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. केजरीवाल यांच्या सभेबाबत आपण त्यांच्या संपर्कात आहोत. लवकरच त्याच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती ‘आप’चे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा. सुभाष वारे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना प्रा. वारे म्हणाले, ‘आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीसाठी शिरूर आणि बारामती मतदारसंघासाठी अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबत राज्यपातळीवर चर्चा सुरू असून, येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा केली जाईल.’

आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीसाठी पक्षातर्फे उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी दिल्लीतून निधी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. उमेदवारांना स्वतःचा पैसा खर्च करावा लागणार आहे. पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी लागणा-या खर्चासाठी लागणारा निधी गोळा करण्यात येत आहे असे प्रा. सुभाष वारे यांनी यावेळी पत्र‍कारांशी बोलताना सांगितले.