बये – वाट अजून सरलेली नाही

आज ८ मार्च. हा दिवस जागतिक महिला दिनाचा दिवस म्हणून विशेष महत्त्वाचा. पुरू षप्रधान संस्कृतीत आपल्या स्वत्वाची जाणीव जागृत होऊन त्यासाठी सार्वजनिक पातळीवर लढा देण्यासाठी  स्त्री सज्ज झाली त्याला शंभरावर वर्षे होऊन गेली. त्याची चांगली फळे आज दिसत आहेत पण अजूनही खूप अंतर बाकी आहे हे कसे विसरणार?  उपलब्ध इतिहासानुसार २० व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत महिलांना मतदानाचा हक्कही नव्हता. महिला चळवळीचे श्रेय जाते कलारा झेटकीन या कम्युनिस्ट कार्यकर्तीकडे. १९०८ साली न्यूर्यार्कच्या वस्त्रोद्योगातील हजारो महिलांनी निदर्शने केली होती आणि त्यावरून प्रेरणा घेऊन कोपनहेगन येथे क्लाराने १९१० साली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरविली आणि तेव्हापासून महिला दिनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारतात १९४३ साली मुंबईत महिला दिनाची सुरवात केली गेली.

लक्ष्मी सारख्या तरूण मुली अॅसिड हल्ला झाल्यानंतरही खचून न जाता, धैर्याने या संकटाचा मुकाबला करून हल्ला करणार्यािच्या नाकावर टिच्चून समाजात कार्यरत आहेत. यामुळेच यंदाचा इंटरनॅशनल वुमन्स अॅवार्ड तिला दिला गेला आहे. बलात्काराची शिकार होत असलेल्या अनेक मुली निर्भया प्रकरणापासून पुढे येऊन आपल्यावरील अत्याचाराविरूद्ध न्याय मागत आहेत.पाकिस्तानातील मलाला मुलींच्या शिक्षणासाठी तालिबानी अतिरेक्यांकडून गोळ्या खाऊनही अजून जिददीने आपले कार्य पुढे नेत आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या आणि जीव कुर्बान करणार्‍या राणी लक्ष्मीबाई आणि साऱ्या जाची मत बनलेले मदर तेरेसा समस्त महिला जगताचे प्रेरणास्थान आहे.

आज जगाच्या इतिहासात जी जी क्षेत्रे अस्तित्वात आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. अगदी अंतराळ मोहिमेपासून ते अत्यंत गरीब वर्गातील महिलांसाठी सुरू झालेल्या स्वयंमदत गटापर्यंत. विज्ञान, कला, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, न्याय, उद्योग, फॅशन, वैज्ञकीय क्षेत्र, संशोधन, तंत्रज्ञान, क्रीडा, शिक्षणक्षेत्र, संरक्षण अशी किती क्षेत्रे सांगायची. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहेतच. आणि तरीही अजून खूप मोठा महिला वर्ग अगदी क्षुल्लक सुविधा आणि हक्कांपासून वंचितही आहे. मात्र दिवसनेदिवस महिलांची होत असलेली प्रगती हा एक आशेचा किरण अजूनही चमकतो आहे आणि दिलासा देतो आहे की आज ना उद्या स्त्रीमुक्ती निश्चत आहे.

यंदाच्या फोर्ब्सच्या अब्जाधीश यादीत १७२ महिलांनी स्थान मिळविले आहे. फेसबुक, याहू सारख्या सोशल साईटच्या सीइओपदी महिला विराजमान आहेत तसेच जगातील पाच देशांचे संरक्षणमंत्री पद महिलां भूषवित आहेत. पंतप्रधानपद असो, राष्ट्रपतीपद असो किवा अगदी कुटुंब असो, पडलेली सगळी जबाबदारी महिला समर्थपणे सांभाळत आहेत आणि केवळ स्वतःचाच नव्हे तर कुटुंबाचा, राज्याच्या, देशाचा आणि पर्यायाने जगाचा विकास करण्यातही हातभार लावत आहेत.

महिला कितीही मोठ्या पदावर गेली तरी तिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळावीच लागते आणि जगात कुठेही त्याला अपवाद नाही. पण माता या शब्दाचा अर्थ नसानसात भिनवूनच ती जन्माला येत असल्याने ही जबाबदारी लिलया पेलण्याची ताकद निसर्गानेच तिला दिली आहे. आर्थिक स्वातंत्र्याची किमतही महिलांनी ओळखली आहे आणि त्यामुळे भारताच्या खेडोपाड्यांतून महिला स्वयंमदत गट, अल्पबचत गट, महिला मदत गट स्थापन करून ते उत्तम तर्हेंने चालवितंही आहेत.

तरीही हे विसरता येणार नाही की अजून मार्ग संपलेला नाही. वाटचाल सुरूच ठेवायला हवी. आधुनिकतेचा तोरा मिरविणार्‍या अमेरिकेत आजही महिला राष्ट्रप्रमुख होऊ शकत नाही ही विषमता विसरायची कशी? ती विसरून चालणारही नाही कारण महिला संतुष्ट होईल तिथे तिची प्रगती थांबेल हे लक्षात ठेवायलाच हवे. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने हा निश्चय करायला हवा.

Leave a Comment