महायुतीच्या तंबूत पळापळ

मुंबई- लोकसभा निवडणूक दारावर येऊन धडकलेली असताना महायुतीतील घोळात घोळ वाढत चाललेला दिसतो. परस्परांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे. महायुतीत आता आणखी कुणाला घेणार नाही, अशा गर्जना वारंवार केल्या जात असताना मनसेला चुचकारण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तर मनसेची साथ मिळाल्यास आपल्याशी भाजप काडीमोड घेईल, या भीतीने शिवसेनेत अस्वस्थता असून त्यातूनच युती तोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या गोंधळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यात सोमवारी झालेल्या भेटीने भरच पडली. त्यातून महायुतीच्या तंबूत रात्रभर पळापळ सुरू होती.

शिवसेना-भाजपने नवे मित्र जोडत महायुतीची जोरदार घोषणा करून जागावाटप पार पाडले असले तरी एकमेकांविषयीचा अविश्वास संपलेला नाही. मुळात महायुतीतच नव्हे, तर देशात राज्यकारभार करू पाहणा-या भाजपमध्ये आपसात समन्वय नसल्याचे पुढे येत आहे. नितीन गडकरी आणि प्रदेश पदाधिका-यांमध्ये कृत्यांमधील अंतर्विरोध वारंवार समोर येत आहे. गडकरी यांनी सोमवारी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीने अस्वस्थ होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडेच दूरध्वनीवरून तक्रार केली.

मनसेबरोबर तुम्हाला जवळीक साधायची असेल तर आम्हाला तुमच्यासोबत येण्यात रस नसल्याचे सांगत युती तोडण्याची धमकी दिली. मग भाजपमध्ये पळापळ झाली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना थेट मातोश्रीवर धाव घ्यावी लागली. ‘मातोश्री’ची मनधरणी करून बाहेर पडण्यास त्यांना रात्रीचा एक वाजून गेला. या अचानक भेटीबाबत त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला असता त्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. अर्थात, तिथून पुढे गेल्यानंतर त्यांनी ट्विटरवर आपण प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी गेलो होतो, असा खुलासा करण्याचा प्रयत्न केला.

मात्र रात्री साडेबारा वाजता एवढी काय तातडी होती, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ती भेट राजकीय नव्हती, असे सांगत गडकरी यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेने मात्र भाजपमध्ये ‘कम्युनिकेशन गॅप असून ती दूर करावी’ अशी अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात कधी शरद पवार यांच्यावर तर कधी राज ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेतून उमटत आहे. अशा प्रकारच्या भेटी होऊन नंतर खुलासेवारी करावी लागत असल्यामुळे महायुतीचा पाय स्थिरावत नसल्याचेच दिसून येत आहे.

Leave a Comment