पुणे – पुणे लोकसभेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून विजयी ठरणा-या उमेदवाराचा शोध सुरूच आहे. त्यासाठी आता भाजपने ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि ‘परम’ सुपरकम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीत उतरण्याची ऑफर दिली आहे. या संदर्भात भटकर यांनी अद्याप होकार अथवा नकार दिलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून समजते.
आगमी काळात होत असलेल्या निवडणूकीसाठी तसे पहिले तर भाजपकडून पुणे मतदारसंघातून शहराध्यक्ष अनिल शिरोळे आणि आमदार गिरीश बापट हे प्रमुख इच्छुक आहेत; तसेच राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर आणि माजी खासदार प्रदीप रावत यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे. त्या तच आता अचानक विजय भटकर यांचे नाव पुढे आले आहे. त्याघमुळे आता भटकर हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपला पुण्यातून निर्विवाद विजय मिळवून देणारा चेहेरा हवा, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. भटकर यांचे नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या केंद्रीय आणि प्रदेश पातळीवरील काही प्रमुख नेत्यांनी काही काळापूर्वी डॉ. भटकर यांच्याशी संपर्क साधला आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील इच्छुकांच्या संख्येत भरच पडते आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुण्यातून प्रथमच लोकसभेवर जाण्याची संधी महिलेस मिळू शकते, असे त्यांनी प्रदेश आणि केंद्रीय निवड मंडळापुढे मांडले आहे. पुण्यातून महिलेला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करून महिला पदाधिका-यानी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांना निवेदन दिले.