राष्ट्रवादीचा आमदार फोडण्यात मुंडेंना अखेर यश, संजय पाटील भाजपात

पुणे- राष्ट्रवादीचे आमदार संजयकाका पाटील यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देत गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना राष्ट्रवादीचा आमदार फोडण्यात अखेर यश आल्याचे मानण्यात येत आहे. रविवारी झालेल्या महायुतीच्या डोंबिवलीतील सभेत येत्या आठवड्यात राष्ट्रवादीचे दोन नेते युतीत आणणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली होती. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या तालुक्यातील व त्यांचे पक्षातंर्गत विरोधक म्हणून संजय पाटलांची ओळख आहे.

संजय पाटलांनी आर आर यांच्याविरोधात निवडणूकाही लढविल्या आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षात संजय पाटील यांच्याशी जमवून घेत आबांनी पक्षाच्या माध्यमातून त्यांना आमदारकी मिळवून दिली होती. मात्र, साखर कारखान्यावरून पुन्हा संजय पाटील आणि आबा यांच्यात ठिणगी पडली व हे प्रकरण पक्षातून बाहेर पडण्यापर्यंत गेले आहे. संजय पाटील यांना लोकसभेचे तिकीट दिले जाणार नाही. पण आगामी विधानसभा निवडणूकीत तासगाव-कवठेमंहकाळ मतदारसंघातून गृहमंत्री आर आर पाटील यांच्या विरोधात भाजप त्यांना उमेदवारी देणार आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्यात दुष्काळी फोरमच्या माध्यमातून राजकारण करणारे राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

मात्र, संबंधित नेत्यांचे कसे पुर्नवसन कसे करायचे यावरून भाजपमध्ये खल सुरु आहे. त्यामुळे खालापूर, जत, कवठेमहंकाळ, तासगाव या तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर माजी आमदार व मंत्री अजित घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख हे तीन नेतेसुद्धा मुंडे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी डोंबिवलीत महायुतीच्या झालेल्या सभेत गोपीनाथ मुंडे यांनी आठवड्याच्या आत राष्ट्रवादीतील दोन नेते महायुतीत आणणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादीचे दोन नेते दोन दिवसात भाजपात आणून आपला शब्द खरा करून दाखवला आहे.

नांदेडमधील माजी खासदार व राष्ट्रवादीचे नेते डी. बी. पाटील यांना स्वगृही आणण्यात मुंडे यांना सोमवारी यश मिळाले. याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार संजयकाका पाटील यांना फोडण्यात मुंडेंनी यश मिळवले आहे. याचबरोबर कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा मुलगा प्रा. संजय मंडलिक यांनीही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक-दोन दिवसात ते सेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच त्यांना कोल्हापूरातून सेनेकडून तिकीट दिले जाणार आहे.

Leave a Comment