हुकूमशाही प्रवृत्तींच्या हाती सत्ता नको – पवार

मुंबई – “मलाच मते द्या, माझ्या हातात सत्ता द्या, मी सांगेन त्याच वाटेने जनतेने जावे, ही प्रवृत्ती हुकूमशाहीची आहे, देशाच्या समाजकारणात आणि राजकारणात हुकूमशाहीला मुळीच स्थान नाही, त्यामुळे जनतेने अशा प्रवृत्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज केले. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथिनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते.

मोदी आणि भाजपच्या राजकारणावर जोरदार टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, की देशात सत्ता कुणी मागत असेल आणि सत्ता आल्यावर विशिष्ट वर्गाचे हित न बघता त्या जनसमुदायाला देशाच्या बाहेर हाकलून देऊ पाहणाऱ्या सांप्रदायिक शक्‍तींनाच लोकसभा निवडणुकीत हद्दपार करा. मी माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात अशा प्रवृत्तींच्या शक्‍तींना कधीही सहन केले नाही आणि यापुढेही सहन करणार नाही. सध्या देशातील वातावरण बिघडविण्याचा विडा काही शक्‍तींनी उचलला आहे. दुर्दैवाने प्रसारमाध्यमेही त्यांच्या बाजूने असल्याचे चित्र दिसत आहे, टीव्ही सुरू केल्यावर गुजरातमध्ये “हे झाले आहे… ते झाले आहे… देशातही हेच झाले पाहिजे…’ अशा जाहिराती केल्या जातात. परंतु गुजरातमध्येच काही जनसमुदायाच्या कत्तली झाल्याचे जनता विसरली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त डॉ. सत्यपाल सिंह यांच्या भाजप प्रवेशावरही श्री. पवार यांनी टीका केली. ज्यांच्या हातात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तेच सेवेत असतानाही विशिष्ट राजकीय पक्षांच्या संपर्कात असतात, याचा अर्थ त्यांनी केलेली जनसेवा प्रामाणिक नव्हती हे सिद्ध होत आहे. प्रशासनातील अधिकारी धर्मनिरपेक्ष असावेत, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले. आजच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, खासदार माजीद मेनन, प्रवक्‍ते नवाब मलिक, प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हबीब फकिह, मौलाना गुलाम वस्तनावी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment