माढासाठी विजयदादांच्या नावावर शिक्‍कामोर्तब ?

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा आज अखेर सुटल्याचे समजते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीवर सर्व नेत्यांचे एकमत झाले, तर बुलडाण्यातून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी दोन्ही मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला.

गेल्या काही दिवसांपासून माढा व बुलडाणा मतदारसंघावरून राष्ट्रवादीमध्ये घालमेल सुरू होती. माढातील उमेदवारीवर विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजयमामा शिंदे यांनी दावा केला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केल्याचे सांगण्यात आले.

पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यासह रामराजे निंबाळकर, पालकमंत्री दिलीप सोपल, बबनराव शिंदे, हनुमंत डोळस, संजयमामा शिंदे, दीपकआबा साळुंखे, राजन पाटील, जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, प्रशांत परिचारक, निशिगंधा माळी, अप्पासाहेब झांजुर्णे आदी नेत्यांसोबत “वन टू वन’ चर्चा केली. या चर्चेनंतर पवार यांनी एकत्रित बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करण्याचे सूतोवाच केले. मात्र, चर्चेअंती विजयदादांचेच नाव निश्‍चित केल्याची माहिती काही नेत्यांनी दिली.

Leave a Comment