मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया

मुंबई – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी ज्येष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून हे पद रिकामे होते आणि त्यावर कोणाची निवड होणार याबाबत बरेच तर्क वितर्क केले जात होते. शेवटी काल राज्याच्या गृहखात्याने मारिया यांची निवड केल्याचे जाहीर केले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यास संमती दिली.

यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले सत्यपाल सिंह यांनी अचानक राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचे घोषित केले त्यामुळे हे पद मोकळे झाले होते. सत्यपालसिंह यांनी भाजपात प्रवेश केला असून उत्तर प्रदेशातल्या मेरठ मतदारसंघातून ते लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यास राज्य सरकारला उशीर लागला.

राकेश मारिया यांनी १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेचा आणि २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्याचा तपास केला होता. ते सध्या महाराष्ट्र शासनाच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते १९८१ सालच्या आयपीएस बॅचचे उमेदवार आहेत.