मतदारसंघांत बदल होणार नाही- शरद पवार

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरुन काँग्रेस व राष्ट्रेवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले होते. मात्र दोन्ही पक्षातील हा तिढा आता सुटला आहे. जागा वाटपाचा फॉम्यूला ठरला असून आता मतदारसंघात मात्र कोणताच बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जागाबदलाच्या चर्चेला आता पूर्णविराम दिला आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘गेल्या निवडणूकीपर्यंत अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवार ठरत नव्हते. आता चार आठवडे आधीच ते ठरत आहेत. त्यामुळे या निवडणूकीसाठी चांगली तयारी करण्याची संधी मिळणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना केजरीवाल यांनी केलेल्या टीकेवर पवार म्हणाले, कदाचित, माझे नाव घेतल्याने माध्यमे मोठी बातमी करतील आणि प्रसिद्धी मिळेल, असा केजरीवालांचा हेतू असावा. जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी सगळे नाटक केले.’

लोकसभा निवडणुकीपर्यंत ‘आप’ची चर्चा होत राहील. हा पक्ष कोणाची किती मते खातो हाच मुद्दा राहील. विजयी होण्याइतपत त्यांचा प्रभाव नाही. काँग्रेसविरोधी मते घेणार असल्याने भाजपला फटका बसेल. दिल्लीत निवडणूक झाल्यास भाजपच्या जागा वाढतील जागांबाबत २००९ चेच सूत्र कायम राहील. दिल्लीतील नेत्यांनाही ते मान्य आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पोहोच नाही. तेथे काय चालले ते त्यांना कळत नाही. मग नको ती विधाने ते करतात, असे पवार म्हणाले.