ठाणे जिल्ह्यात बोगस पदव्या देणारे अटकेत

ठाणे – ठाणे जिल्हा पोलीस कार्यालयाच्या गुन्हे शाखेने भायंदर येथे एका सायबर कॅफेवर छापा टाकून दोघांना अटक केली आणि बोगस पदवी प्रमाणपत्र देणारे रॅकेट उघड केले. अटक केलेल्या दोघांची नावे महेंद्र राजेंद्र चव्हाण आणि सिकंदर शहाबुद्दीन शेख अशी असून सिकंदर शेख हा भायंदरचा आणि महेंद्र चव्हाण हा अंधेरीचा राहणारा आहे.

एका अनोळखी व्यक्तीने दिलेल्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली. भायंदरमध्ये काही लोक बनावट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तयार करून विकत असल्याचे या अनोळखी व्यक्तीने पोलिसांना सांगितले होते आणि हा छापा टाकला गेला तेव्हा तसे दिसून आले. हे टोळके पालघर तालुक्यातील अभिनव विद्यालय या शाळेच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांची छपाई करत असताना सापडले.

एका रिक्षा चालकाला आपल्या वाहक परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला हवा होता आणि प्रत्यक्षात तो शिकलेला नव्हता. त्यामुळे त्याने बनावट प्रमाणपत्र हस्तगत करायचे ठरवले आणि चव्हाण हा अशी प्रमाणपत्रे देतो असे त्याला कळल्यावरून त्याने चव्हाणशी संपर्क साधला. या कारवाईनंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता चव्हाण आणि शेख हे बर्‍याच लोकांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याचे दिसून आले.