मनमोहनसिंगाना दिलेली मेजवानी सर्वात खर्चिक

वॉशिग्टन – अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ सालात सूत्रे हाती घेतल्यानंतर  १५.५ लाख डॉलर्स खर्च करून ज्या परदेशी प्रमुखांना मेजवान्या दिल्या त्यात सर्वाधिक खर्चिक मेजवानी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना दिलेली मेजवानी होती असे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकाराच्या हक्कातून मिळालेल्या माहितीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. मनमोहनसिंग यांच्या मेजवानीसाठी ओबामा प्रशासनाने ५,७२,१८७.३६ डॉलर्स इतका खर्च केला.ही मेजवानी २४ नोव्हेंबर २००९ साली दिली गेली होती. ही माहिती स्टेट डिपार्टमेंट ऑफिस ऑफ प्रोटोकॉल रेकॉर्डसकडून १३ महिन्यांपूर्वीच मागण्यात आली होती ती आत्ता संबंधितांना दिली गेली आहे.

परदेशी प्रमुखांसाठी अशा मेजवान्या देण्याची पद्धत आहे मात्र हा खर्च सर्वसामान्य नागरिकांकडून गोळा होत असलेल्या करांतूनच केला जात असतो म्हणजेच अशा मेजवान्यांचा भार सर्वसामान्य नागरिकांवरही येत असतो म्हणून ही माहिती मागवली गेली होती असे सांगितले जात आहे.

ओबामा यांनी १९ मे २०१० साली मेकिसकन प्रेसिडेंट पिलिफ कार्डेरॉन यांना दिलेल्या मेजवानीसाठी ५,६३,४७९.९२ डॉलर्स. ११ जानेवारी २०११ साली चीनचे प्रेसिडेंट हू जिताओ यांना दिलेल्या मेजवानीसाठी ४,१२,३२९.७३ डॉलर्स, ७ जून २०११ ला जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या मेजवानीसाठी २,१५,८८३.३६ डॉलर्स, १३ आक्टोबर २०१३ ला दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली म्युंकबक यांना दिलेल्या मेजवानीसाठी २.०३,०५३.३४ डॉलर्स असा खर्च केला आहे. मार्च २०१२ ला ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून आणि नुकतीच भेट दिलेले फ्रान्सचे अध्यक्ष होलेंड यांच्या मेजवानीसाठी झालेल्या खर्चाचे तपशील अद्याप मिळालेले नाहीत असेही समजते.

Leave a Comment