ही राष्ट्रवादीची सरशी आहे का?

येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जागांचे वाटप कसे करावे यावरून झालेल्या वादात तोडगा काढण्यात आला असून त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसला २२ जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेस २६ जागा लढवणार आहे. हा राष्ट्रवादीचा विजय आहे का यावर वाद होईल परंतु तसा तो असेलच तर त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपा नेते नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत. कारण राष्ट्रवादीने मोदींशी हात मिळवणी करण्याची धमकी दाखवूनच या जागा पदरात पाडून घेतल्या आहेत असे मानले जात आहे. २००९ साली महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या आघाडीमध्ये कॉंग्रेसने २६ आणि राष्ट्रवादीने २२ जागा लढविल्या होत्या. परंतु यावेळी राष्ट्रवादीची बोळवण १६ जागांवर करावी असा काही कॉंग्रेस नेत्यांचा डाव होता मात्र तो उधळला गेला आहे आणि राष्ट्रवादीने आता या डावपेचात कॉंग्रेसवर मात केली असून १६ जागांवर बोळवण करण्याचा त्यांचा मनसुबा उधळला आहे. यात पवारांचा विजय झाला असे वाटत असले तरी प्रत्यक्षात २००९ पेक्षा त्यांना एकही जादा जागा मिळालेली नाही. म्हणजे एक प्रकारे कॉंग्रेसने त्यांना २२ जागांवर समाधान मानायला लावले आहे. अर्थात, यासाठीसुध्दा पवारांना आघाडी मोडण्याची धमकी द्यावी लागली आणि त्या दृष्टीने काही डावपेच लढवावे लागले.

शरद पवार हे गेल्या १५ वर्षापासून कॉंग्रेसच्या सोबत आहेत. त्यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्यावरून पक्ष फोडून आपला पक्ष स्थापन केला होता पण त्याच्या एकाच वर्षाच्या आत सोनिया गांधींचा हा विरोध गुंडाळून ठेवून त्यांनी त्यांच्याशी हात मिळवणी केली. अशी हातमिळवणी झाली असली तरी पवार कॉंग्रेस बरोबर कधी सुखाने नांदले नाहीत. त्यांची गेल्या १५ वर्षातली वाटचाल अशा छोट्या मोठ्या डावपेचांनीच भरलेली आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या एका डावपेचाने मोठी खळबळ माजली. त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. या गोष्टीने भाजपा, शेतकरी संघटना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील मुस्लीम नेते अस्वस्थ झाले. आता राज्यातली नवी मांडणी कशी असेल यावर चर्चा झडायला लागल्या. मात्र थोड्याच दिवसात असे लक्षात यायला लागले की, प्रफुल्ल पटेल यांच्या तोंडून मोदी स्तुती करून पवारांना मोदींशी मैत्री करायची नाही. त्यांचा हा डाव नेहमीप्रमाणे ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ अशा थाटाचा आहे आणि तो तसाच होता. बर्‍याच लोकांनी तो उघडपणे बोलूनसुध्दा दाखवला.

देशात अनेक प्रकारच्या आघाड्या आहेत. त्यात काही पक्ष अस्वस्थ असतात तर काही विचलित झालेले असतात. परंतु अन्य कोणत्याही आघाडीतला कोणताही पक्ष शरद पवार यांचे एवढे डावपेच लढवत नाही. पवारांना महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीत कॉंग्रेसकडून जास्त जागा हव्या आहेत. म्हणून कॉंग्रेसला धमकावण्यासाठी ते मोदींचा बागुलबोवा दाखवतात. अगदीच सोपे करून सांगायचे तर असे म्हणता येईल की, मी मागतो तशा २२ जागा मला द्या नसता मी आघाडी मोडून मोदींच्या सोबत जातो. असे त्यांना कॉंग्रेसच्या लोकांना धमकावयाचे असते. आताही त्यांनी तीच चाल खेळलेली आहे आणि तिचा फायदाही घेतलेला आहे. कॉंग्रेसमध्ये माणिकराव ठाकरे यांच्यासारखे काही नेते पवारांचा शक्य तेवढा पाणउतारा करण्याचा प्रयत्न करतात. पवारांची महाराष्ट्रात काही ताकद नाही असे ते नेहमी भासवत असतात. २००९ साली लोकसभेतल्या कॉंग्रेसच्या जागा वाढून २०६ वर गेल्या त्यामुळे कॉंग्रेसचे नेते एवढ्या गर्वात आले की त्यांनी महाराष्ट्रात आपल्याला शरद पवार यांची गरजच नाही असे भासवायला सुरूवात केली. कधी तरी एखादा कॉंग्रेसचा नेता, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसमध्ये विलिनच होऊन जाणार आहे अशीही चर्चा उपस्थित करायला लागला नाही तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्तित्वाचा अर्थच काय असाही सवाल कॉंग्रेसचे नेते करायला लागले.

परंतु २००६ जागांचा फुगारा म्हणजे कॉंग्रेसची खरी ताकद नव्हे, कॉंग्रेसकडे समर्थ नेतासुध्दा नाही, भ्रष्टाचाराच्या एकामागोमाग बाहेर पडलेल्या प्रकरणांमुळे पक्ष बदनाम झाला आहे. हे त्यांच्या लक्षात यायला लागले आणि त्यांचे पाय जमिनीवर टेकायला लागले. आता ही विलिनीकरणाची भाषा बंद झाली आहे. पण तरीसुध्दा २००९ साली महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या १८ जागा निवडून आल्या आणि राष्ट्रवादीला त्याच्या निम्म्याही जागा मिळाल्या नाहीत. त्याचा गर्व अजून शिल्लक आहे. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसला येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी केवळ १६ जागा सोडाव्यात आणि ३२ जागा आपण लढवाव्यात असा विचार कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी सुरू केला होता. मुळात तर राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युतीच नको असे काही नेत्यांचे म्हणणे होते. पक्षाचे नेते राहुल गांधी हे पुण्यात एका दौर्‍यासाठी आले असताना कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी हा विचारही बोलून दाखवला होता. मात्र राहुल गांधींना आपली खरी ताकद माहीत आहे. त्यांनी स्वबळाची कल्पना फेटाळून लावली. तशी ती फेटाळून लावली असली तरी राष्ट्रवादीची बोळवण १६ जागांवर करावी या कल्पनेला राहुल गांधींचा पाठिंबा होता. मात्र शरद पवारांनी १६ जागांची भाषा बोलणार असाल तर सरळ भाजपाशी हातमिळवणी करतो असा दमच दिला. ते मात्र कॉंग्रेसला परवडणारे नाही हे राहुल गांधींच्या लक्षात आले.

Leave a Comment