कुणीही आलं तरी टोल बंद होणार नाही -अजित पवार

पुणे – टोल नाक्यावरुन मनसेनं आक्रमक आंदोलन करत राज्यभरातले टोल फोडून काढले तर महायुतीचं सरकार आल्यावर राज्य टोलमुक्त करु असं भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी जाहीर केलं. पण कुणीही आलं तरी टोल बंद करू शकत नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. बारामतीत युवक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. टोल हा भाजप युतीच्या काळातच आलेला आहे. 400 ते 500 कोटींचे रस्ते झाले तिथे टोल उभारावेच लागले.

केंद्राने स्वत: टोल उभारले आहे. राज्य टोलमुक्त करू अशा गप्पा जे हाणताय त्या युती सरकारच्या काळात मुंबईत 55 उड्डाणपूल आणली, एवढेच नाही तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेही युती सरकारच्या काळात तयार झाला. यावर टोल त्यांच्याच सरकारने आणले, त्यामुळे यापुढेही टोल सुरूच राहील कुणीही आलं तरी टोल काढू शकत नाही असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं. या अगोदरही अजित पवारांनी मनसेच्या टोलफोडीवर टीका करत टोल बंद होणार नाही असं स्पष्ट केलं होतं.

Leave a Comment