टोल वसुली हे वाटमारीचे परवाने’ – राजू शेट्टी

पंढरपूर – ‘राज्यात आणि विशेषतः कोल्हापूरमध्ये टोलविरोधी आंदोलन सुरू असतानाही राज्य सरकार याबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे. ही टोल वसुली म्हणजे राज्य सरकारने या ठेकेदारांना कायदेशीररित्या वाटमारी करण्यासाठी दिलेली परवानगी आहे,’ असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात केला. तसेच, महायुती सत्तेवर आल्यास टोल माफ करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी माढा मतदारसंघात आलेल्या शेट्टींनी राज्यात महायुतीला यश मिळण्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर, खासदार शेट्टी यांनी साखर उद्योग मोडित काढण्याचा ठेका घेतला असल्याच्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या टिकेलाही त्यांनी उत्तर दिले. ‘आम्ही ऊस उत्पादकांना चार पैसे मिळावेत यासाठी आंदोलन करीत आहोत. शरद पवारांच्या बगलबच्च्यांनी जी साखर कारखानदारी मोडून खाण्याचा सपाटा सुरू केला आहे, ती साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादकांना वाचवण्याचा आम्ही ठेका घेतला आहे,’ असे थेट उत्तर शेट्टी यांनी दिले.

‘स्वाभिमानी संघटना महायुतीमध्ये सामील झाली आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात माढा लोकसभेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र, माढा लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दावा कायम असून, समन्वय समितीमध्ये आपली भूमिका पटवून देऊ,’ अशी आग्रही भूमिका खासदार शेट्टी यांनी मांडली.

Leave a Comment