केजरीवाल यांचा दुटप्पीपणा

देशात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणार्‍या संघटनांनी जन्मभर आंदोलन करूनच व्यवस्था बदलावी की या व्यवस्थेत शिरकाव करून तिथे जाऊन ती बदलावी या वरून अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्यात मतभेद आहेत. हे सर्वांना माहीत झाले आहेत. केजरीवाल यांच्या राजकीय पक्ष स्थापनेला अण्णांचा विरोध होता. तुम्ही एकदा निवडणुकीच्या राजकारणात पडलात की लांड्या लबाड्या करणे आवश्यक ठरते. म्हणून राजकारणात जाणे नकोच हे अण्णांचे म्हणणे आहे. आता अरविंद केजरीवाल यांची परवड पाहिल्यानंतर अण्णांचे म्हणणे किती खरे होते हे लक्षात येते. केजरीवाल यांनी काल भ्रष्ट आणि बेईमान नेत्यांची यादी जाहीर केली. परंतु त्यांनी ज्या क्षणी शीला दीक्षित यांच्यासारख्या भ्रष्ट नेत्यांचा हात हाती घेतला आणि त्यांच्या पाठिंब्यावर सत्ता हस्तगत केली त्याचक्षणी असा न्यायनिवाडा करण्याचा नैतिक हक्क गमावला गेला आहे. अर्थात, आपल्या या अवस्थेची जाणीव त्यांना नाही. म्हणून ते अजूनही प्रभू रामचंद्राचा आव आणून भ्रष्ट नेत्यांच्या याद्या जाहीर करायला लागले आहेत. त्यांनी काल लोकसभा निवडणूक विषयक धोरणांची घोषणा करताना भ्रष्ट नेत्यांची यादी प्रसिध्द केली आणि भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे उमेदवार उभे राहतील अशी घोषणा केली.

नरेंद्र मोदी, शरद पवार, राहुल गांधी अशा काही अव्वल नेत्यांची नावे या यादीत आहेत. आम आदमी पार्टीचे उमेदवार त्यांच्या विरोधात उभे राहतील आणि त्यांचा भ्रष्टाचार उघड करतील असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. केजरीवाल यांनी या सार्‍या बेईनाम लोकांची वर्गवारी जाहीर करायला हवी होती. कारण भारतातल्या राजकारणातल्या गुन्हेगारीविषयी आणि भ्रष्टाचाराविषयी नेहमीच अर्धवट, संदिग्ध आणि काहीवेळा खोटीसुध्दा माहिती प्रसिध्द केली जात असते. त्यामुळे केजरीवाल यांनी ही नावे जाहीर करताना अ दर्जाचे भ्रष्ट आणि ब दर्जाचे भ्रष्ट कोण असा काहीतरी भेद करायला हवा होता. शिक्षा झालेले भ्रष्ट नेते, खटले दाखल झालेले पण शिक्षा न झालेले नेते तसेच केवळ आरोप झालेले पण खटलासुध्दा न भरलेले नेते असेही या नेत्यांचे प्रकार असतात. त्यामुळे सगळ्या नेत्यांना सरसकट एका माळेत गुंफणे हा त्यांच्यावर अन्याय ठरतो. तशी वर्गवारी केली असती तर लोकांनाही योग्य मार्गदर्शन लाभले असते. परंतु त्यांनी सर्वांना एकाच सदरात बसवून टाकले आहे. केजरीवाल यांची ही यादी कोणी सहजासहजी मान्य करील असे वाटत नाही. कारण या यादीत राहुल गांधींचाही समावेश केला गेला आहे.

राहुल गांधी हे भ्रष्ट कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत परंतु त्यांच्यावर व्यक्तीश: कसलाही आरोप दाखल झालेला नाही आणि त्यांच्यावर कोणी भ्रष्टाचाराचा आरोपसुध्दा दाखल केलेला नाही. पण केजरीवाल यांनी त्यांना आपल्या यादीत घेतले आहे. ही यादी करताना केजरीवाल यांनी स्वत:कडे न्यायाधीशाची भूमिका घेतली आहे. पण त्यांना न्यायाधीश केले कोणी आणि त्याला भ्रष्ट कोण आणि स्वच्छ कोण हे जाहीर करण्याचा अधिकार दिला कोणी असा प्रश्‍न पडतो. तो प्रश्‍न साहजिक आहे. कारण अरविंद केजरीवाल आपल्या यादीचे कसलेही स्पष्टीकरण करत नाहीत. मनाला येईल त्याला भ्रष्टाचारी जाहीर करतात. आपल्या मनाला येईत तशी बदनामी करणे हे केजरीवाल यांना अगदी सहज वाटते. म्हणून ते यादी जाहीर करताना न्यायबुध्दी दाखवत नाहीत. या यादीत राहुल गांधी कसे आले असा प्रश्‍न विचारल्यावर त्याचे उत्तर आहे एका कार्यक्रमात ते नवीन जिंदल यांच्या बरोबर आहेत. केजरीवालांच्या मते जिंदल हे भ्रष्ट आहेत. कोळशाच्या खाणीच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहे. राहुल गांधी स्वत: गुन्हेगार नसले तरी एका आरोपीला ते जवळ घेऊन बसले आहेत म्हणजे राहुल गांधी गुन्हेगारच ठरतात. या जिंदल यांच्यावर आरोप आहेत पण ते सिध्द झालेले नाहीत. आरोपी आणि गुन्हेगार यात केजरीवाल ङ्गरक करत नाहीत. मग त्या अर्थाने आम्ही केजरीवाल सुध्दा या यादीत यायला पाहिजेत. कारण त्यांच्यावर सुध्दा निवडणुकीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचा आरोप आहे.

ते आरोपीलाच गुन्हेगार ठरवत आहेत आणि आरोपी सोबत स्टेजवर बसणार्‍यांना गुन्हेगार ठरवत आहेत. हाच न्याय लावायचा ठरवला तर भारतातल्या कोणत्याही पक्षाचा नेता निर्दोष ठरणार नाही. कारण कोणत्याही कार्यक्रमास स्टेजवर बसताना आपल्या जवळ बसलेले लोक कशा चारित्र्याचे आहेत हे बघण्याची सोय अजून तरी उपलब्ध झालेली नाही. त्या न्यायाने केजरीवाल सुध्दा दोषी ठरतात. कारण केजरीवाल भ्रष्ट कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बाजूलाच दिल्ली विधानसभेत बसत आहेत. त्यांनी केलेल्या या यादीमध्ये कपील सिब्बल यांचे नाव आहे. त्यांच्या मते कपील सिब्बल गुन्हेगार आहेत पण केवळ एक आठवड्यापूर्वीच केजरीवाल आणि कपिल सिब्बल यांचे एकमेकाला मिठी मारलेले छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले आहे. नवीन जिंदलबरोबर स्टेजवर बसल्यामुळे राहुल गांधी गुन्हेगार ठरत असतील तर कपील सिब्बल यांना मिठी मारल्यामुळे केजरीवाल सुध्दा गुन्हेगार ठरायला पाहिजेत. कॉंग्रेसचे नेते बेईमान आहेत मग या बेईमान कॉंग्रेसचा पाठींबा घेऊन सरकार स्थापन करणारे केजरीवाल कोण आहेत? हा प्रश्‍न स्वत:ला न्यायाधीश म्हणवणार्‍या केजरीवाल यांच्या डोक्यात येत नाही. त्यांचे सरकार शीला दीक्षित यांच्या कृपेने चाललले आहे. त्यामुळे या शीला दीक्षित यांचे नाव नाही. आता अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मग अशा मंत्र्याला मंत्रीमंडळात ठेवणारे अरविंद केजरीवाल हे बेईमान ठरत नाहीत का? अरविंद केजरीवाल यांचा लोकांना बेईमान ठरवतानाचा निकष वेगळा आहे तो ते स्वतः मात्र लावत नाहीत. इथे त्यांचे ढोंगीपण उघड होते.

Leave a Comment