आघाडीबाबत लवकर निर्णय घ्या, काँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा

मुंबई- आघाडी व जागावाटपाबाबत लवकरात लवकर चर्चा करून निर्णय घ्या, अन्यथा आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफ्रुल्ल पटेल यांनी याबाबत आज मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर हा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आज भेट घेऊन ते सविस्तर चर्चा करणार आहेत. आघाडीबाबत होत असलेला उशीर हा खेदजनक असल्याचे मतही पटेल यांनी यावेळी व्यक्त केले.

सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या बैठकीला दिलीप वळसे-पाटील, वसंत डावखुरे, पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, मधुकर पिचड, सुनील तटकरे, गणेश नाईक, पद्मसिंह पाटील, मनोहर नाईक, सचिन आहिर, विजयकुमार गावित, सुरेश धस, फौजिया खान, राजेश टोपे, भास्कर जाधव, संजय पाटील, नवाब मलिक, विद्या चव्हाण, उषा दराडे आदी नेते उपस्थित होते.

या बैठकीत काँग्रेस पक्ष आघाडीबाबत एकही पाऊल पुढे टाकत नसल्याचे वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून दिले. काँग्रेसने लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा तरच लोकसभेच्या निवडणुकीची पुरेशी तयारी करता येईल, असे पक्षातील इच्छुकांचे म्हणणे होते.

यावर पक्षाकडून काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करून आघाडीबाबत काय निर्णय घ्यायचा व तो कधीपर्यंत घ्यायचा यावर चर्चा होणार आहे. यासाठी पटेल यांच्यासह पक्षाचे एक दोन नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याबाबत ते चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या पक्षाचे म्हणणे मांडणार आहेत.

Leave a Comment