नागपूर मेट्रो प्रकल्पास मंजुरी

मुंबई- नागपूरमधील मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. साधारण ४० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या रेल्वेतून रोज सुमारे साडेतीन लाख लोक प्रवास करु शकतील अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी ३५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या खर्चापैकी ५० टक्के खर्च कर्जाच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल. तर बाकीचा खर्च राज्य सरकार, महापालिका, नागपूर सुधार समिती यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नागपूरसह आजुबाजूच्या अनेक परिसरांचा विकासही मोठ्या प्रमाणात होण्याची अपेक्षा आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रोसोबतच वरिष्ठ अधिका-यांना त्यांच्या कार्यकालात आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात एकदा तरी काम करावेच लागेल असाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.