लंडन – स्टेम सेल्स्च्या तंत्रज्ञानामध्ये ऐतिहासिक यश मिळवीत शास्त्रज्ञांनी स्टेम सेल्स्पासून गर्भासारखा अवयव तयार करण्याची सोपी आणि स्वस्त पद्धती शोधून काढली असून या कृत्रिम गर्भापासून नव्या प्रकारच्या उतींची निर्मिती करणे शक्य झाले आहे. शास्त्रज्ञांनी या संशोधनाचे वर्णन युगप्रवर्तक अशा शब्दात केले आहे.
कोणत्याही प्राण्याचे शरीर तयार होताना ते निरनिराळ्या पेशींपासून होत असते. मात्र या पेशी कृत्रिमरित्या तयार करता येत नाहीत. त्या तशा आल्या तर कृत्रिम मानव निर्माण करता येईल. आजवर तरी कृत्रिमरित्या पेशी तयार करण्यात यश आले नव्हते. आता मात्र तशा त्या तयार करू शकेल असा कृत्रिम गर्भ विकसित करण्यात आला आहे. म्हणजे प्रयोगशाळेत माणूस निर्माण करण्याच्या दृष्टीने निर्णायक पाऊल पुढे पडले आहे.
हा कृत्रिम गर्भ स्टेम सेल्स्पासून तयार केलेला आहे. म्हणजे या निमित्ताने जपानमधल्या या शास्त्रज्ञांनी स्टेम सेल्स्च्या तंत्रज्ञानात सुद्धा एक झेप घेतली आहे. जपानमधील विमेन्स् हॉस्पिटल आणि अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील शास्त्रज्ञांनी संयुक्तरित्या हा प्रयोग केलेला आहे.