राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी टोल भरू नये, टोल मागण्यासाठी कोणी आडवा आला तर त्याला तुडवून काढा अशी चिथावणी देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील राजगड आणि लोणी-काळभोर पोलिस ठाण्यात राज यांच्यासह पक्षाच्या अन्य १७ पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज यांनी नवी मुंबईतील पक्षाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी मुंबई,पुणे, अहमदनगर, नाशिक येथील टोल नाक्यांवर हल्ले केले होते. यासंदर्भात राजगड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक हणमंत शिंदे यांनी राज आणि मनसेच्या पदाधिका-यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांवर भारतीय दंडविधान संहिता कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३५३, ३३२, ३३३, १०९, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.