पिंपरी-चिंचवडचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली

पिंपरी चिंचवड: येथील महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बुधवारी अचानक बदली होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. कुणीही आयुक्तांच्या बदलीची मागणी किंवा तक्रार केलेली नाही आणि आयुक्तांचा कार्यकाळ संपला नसतानाही बदली होत असेल तर ती अन्यायकारक आहे अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यां ची आगामी काळात होत असलेली बदली रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. राष्ट्रवादीच्या महापौरांनीही आयुक्तांची बदली झाली तरी आम्हाला पर्वा नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध विरोधी पक्ष असा सामना या आंदोलनादरम्यान रंगणार असे स्पष्ट झाले आहे.

या आंदोलनात पिंपरी चिंचवड येथील आधी आप, मग मनसे आणि भाजपही या आंदोलनात उतरले आहेत. यांसदर्भात भाजपच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. ही बदली थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना आपण पत्र लिहून विनंती करणार असल्याचे आश्वासन अण्णांनी त्यांना दिल्याचं भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका-यानी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांनी कारवाई करू नये अशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका घेतली होती. मात्र आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून संबंधित अधिका-यावर निलंबनाची कारवाई केली होती. यामुळे अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच परदेशी यांची बदली केली जात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Comment