न्यूयॉर्क – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे खरोखरच पंतप्रधान बनले तर अमेरिकेसाठी ते नवे संकट ठरेल असे भाकित लोकप्रिय आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या टाईम मासिकाचे संपादक मायकेल क्राऊली यांनी वर्तविले आहे. येत्या २७ जानेवारीला हा लेख असलेला अंक प्रसिद्ध होत आहे.
क्राउली आपल्या लेखात म्हणतात, भारतीय राजदूत देवयानी खोब्रागडे यांच्या व्हिसा फ्रॉड आणि मोलकरीण प्रश्नावरून उठलेल्या वादळात खोब्रागडे यांना भारतात परतावे लागले आहे. मात्र या प्रकारामुळे भारत अमेरिका संबंध ताणले गेले आहेत ते इतक्यातच सुरळीत होण्याची शक्यता नाही. त्यातच भारतात आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपला विजयाची संधी अधिक असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे. भाजप सत्तेवर आल्यास नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनणार हे नक्की आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने मोदी यांना व्हीसा देण्यावरही निर्बंध घातले असल्याने ही बाब अमेरिकेसाठी नवे संकट ठरू शकते.
गुजराथेत २००२ साली झालेल्या जातीय दंगली संदर्भातील मोदींच्या भूमिकेवरून त्यांना अमेरिकेने व्हीसासाठी च्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. जोपर्यंत मोदी राष्ट्रीयदृष्ट्या अतिमहत्वाचे नेते नव्हते तोपर्यंत या निर्बंधांना महत्त्व नव्हते. मात्र ते पंतप्रधान बनल्यानंतर असे निर्बंध घालण्याचे धैर्य अमेरिका दाखवेल काय हा खरा मुद्दा आहे. अर्थात मोदी यांना गुजराथेतील जातीय दंगलींबाबत कोणत्याच न्यायालयाने दोषी ठरविलेले नाही त्यामुळे तर हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे आणि अमेरिकेसाठी हे संकट ठरू शकते.