बाळासाहेबांच्या १०० कोटींच्या संपत्तीवरून भावांत वाद

मुंबई – शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून निर्माण झालेला वाद आता न्यायालयात पोहोचला असल्याचे वृत्त आहे. बाळासाहेबांचे पुत्र आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी चार शिवसेना नेत्यांच्या समवेत यासदंर्भात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याला बाळासाहेबांचे धाकटे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी आव्हान दिले असून बाळासाहेबांची संपत्ती १०० कोटींवर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

उद्धव यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांनी केलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे त्यांची सर्व संपत्ती उद्धव यांच्या नावे केली आहे. बँक डिपॉझिटसह ही संपत्ती १४ कोटी ८५ लाख रूपये असल्याचे उद्धव यांचे म्हणणे आहे. १७ नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेबांचे निधन झाले, त्यापूर्वी म्हणजे १३ डिसेंबर २०११ रोजीच बाळासाहेबांनी मृत्यूपत्र केले होते त्यावर अधिक शिरोडकर, अनिल परब, शशी प्रभू आणि रविद्र म्हात्रे यांचा एक्झिक्युटर म्हणून उल्लेख केला आहे. बाळासाहेबांचे दिवंगत पुत्र बिंदूमाधव यांच्या कुटुंबियांसाठीही बाळासाहेबांनी मृत्यूपत्रानुसार कांहीही ठेवलेले नाही असा उद्धव यांचा दावा आहे.

उद्धव यांच्या म्हणण्याप्रमाणे जयदेव बर्‍याच वर्षांपूर्वी मातोश्री सोडून बाहेर पडले आहेत, पत्नी स्मिताशी त्यांनी घटस्फोट घेतला असून ते दोघेही वेगळे राहतात. बाळासाहेबांच्या राहत्या मातोश्री इमारतीतील तळमजला सामाजिक राजकीय बैठकांसाठी ठेवला गेला आहे तर दुसरा आणि तिसरा मजला उद्धव व त्यांच्या कुटुंबासाठी दिला गेला आहे. पहिला मजला जयदेव यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासाठी ठेवला गेला आहे.

याउलट जयदेव यांच्या म्हणण्याप्रमाणे हे मृत्यूपत्रच संशयास्पद असून बाळासाहेबांची संपत्ती १०० कोटींच्या वर आहे. एकट्या मातोश्री इमारतीची किंमतच ४० कोटींपेक्षा अधिक आहे आणि सर्वांना त्यातील समान वाटा मिळाला पाहिजे.

Leave a Comment