पडघम वाजले, पण…

लोकसभा निवडणुकीची हवा तापत असतानाच दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची विस्तारित अधिवेशने एकाच वेळी पार पडली. या दोन्ही पक्षांचे निवडणुकीतले डावपेच नेमके कसे असतील याचा अंदाज घेण्यासाठी हे दोन्ही कार्यक्रम उपयुक्त होते. परंतु याच दिवशी कॉंग्रेसचे केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नीचे संशयास्पद निधन झाले त्यामुळे या दोन अधिवेशनांच्या बातम्या झाकोळून गेल्या. त्या फारशा तपशीलाने प्रसिद्ध झाल्या नाहीत आणि त्यांची फार चर्चाही झाली नाही. विशेषत: कॉंग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर होणार असा गवगवा आधीच झालेला होता आणि या घोषणेकडे भारतीय जनता पार्टीचे नेते डोळे लावून बसले होते. कारण एकदा या पदासाठी राहुल गांधी यांचे नाव जाहीर झाले की, भाजपाच्या नेत्यांना राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात तुलना करण्याची संधी मिळणार होती. तशी तुलना केल्यास नरेंद्र मोदी सरस ठरतात हे माध्यमांमध्ये अनेक वेळा दिसून आले आहे. परंतु कॉंग्रेसच्या अधिवेशनात तशी घोषणा करण्यात आली नाही. ही एक प्रकारे माघारच आहे. परंतु कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार हे राहुल गांधीच असणार हे सूचित करण्यात कॉंग्रेसचे नेते कुठेही मागे राहिलेले नाहीत.

राहुल गांधींनी सुद्धा आपण भावी पंतप्रधान आहोत अशा आविर्भावातच भाषण केले. त्यामुळे मोदी आणि राहुल गांधी यांच्यातच तुलना होणार हे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांचे भाषण हा एक चर्चेचा विषय करावा अशा कॉंग्रेसच्या नेत्यांचा विचार आहे. कारण त्यांनी मोठ्या तयारीनिशी हे भाषण केले आहे. तसे हे भाषण फार प्रभावी नव्हते, मात्र राहुल गांधी यांनी आजपर्यंत एवढे प्रभावी भाषण कधी केलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांना त्यांचे कौतुक वाटावे असे ते भाषण होते. आपल्या पक्षाने खूप कामे केली आहेत, पण त्यांचे मार्केटिंग केलेले नाही. भाजपचे नेते मात्र कामे करत नाहीत, केवळ मार्केटिंगच करतात असा आरोप त्यांनी केला. मात्र आजच्या काळात आपण केलेल्या कामाचे मार्केटिंग म्हणजे प्रसिद्धी करणे यात चूक काय आहे. केलेले मार्केटिंग काम करून केलेले आहे की न करता केलेले आहे हे लोकांना कळतेच. मग कॉंग्रेसचा हात कोणी धरला होता? खरे म्हणजे राजकीय पक्षाच्या प्रचाराचे मार्केटिंग हा विषय राजीव गांधींनीच पहिल्यादा वापरला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी यांनी एका मार्केटिंग कंपनीलाच मक्ता दिला होता. या कंपनीने त्यावेळी भारतातील तरुण मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे राजीव गांधी यांनी तरुणांना आवडेल असे कपडे घालावेत, असा सल्ला दिला होता.

कॉंग्रेससाठी मार्केटिंग ही गोष्ट तशी नवी नाही. पण राहुल गांधींना ते मार्केटिंग करता येत नाही ही आपली कमतरता त्यांनी मान्य केली. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी अनेक विषय घेतले असे त्यांचे कौतुक होत आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर मतदारांच्या विविध गटांना आकृष्ट करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष यापेक्षा वेगळे काही करत नसतो. असे असले तरी राहुल गांधी यांच्या भाषणात महागाईचा उल्लेख झाला नाही. कारण त्यांच्या सगळ्या भाषणावर पाणी फिरविण्याची क्षमता महागाईच्या मुद्यात आहे. किंबहुना पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपण महागाई रोखू शकलो नाही असे कबूलच केले आहे. तेव्हा राहुल गांधींच्या भाषणातील ही कमतरता म्हणजेच कॉंग्रेसची लंगडी बाजू आहे. भाजपाच्या अधिवेशनात या गोष्टीवर भर दिला जायला हवा होता. तेवढा तो दिला गेला नाही. आता निवडणुकीत बहुतेक तोच मुद्दा उपस्थित केला जाईल असे दिसते. राहुल गांधी यांचे भाषण कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे ठरले असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसचे नेते निवडणूक लढवतात तेव्हा भाषण ही त्यांची कधी जमेची बाजू नसतेच. विरोधी पक्षांकडे ते अस्त्र चांगलेच प्रभावी असते. कॉंग्रेसचे नेतेही ही गोष्ट मान्य करतात.

नरेंद्र मोदी आक्रमक भाषण करतात तसे तेवढे आक्रमक भाषण राहुल गांधींना येत नाही, असे अनेक कॉंग्रेस नेत्यांनी अनेकदा म्हटले आहे. मात्र हीच मंडळी नरेंद्र मोदींच्या भाषणाची स्तुती करताना, या भाषणाचे मतात रुपांतर होणार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करतात. किंबहुना भाषणे केल्याने मते मिळत नसतात असे त्यांना म्हणायचे असते. आता राहुल गांधींच्या भाषणाची प्रशंसा करणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांना एवढे उत्साहाचे भरते आले आहे, पण राहुल गांधींच्या भाषणाचे तरी मतांत रुपांतर होणार आहे का, असा प्रश्‍न आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी, संघटनेत मोठे फेरबदल करणार? अशा घोषणा करत आहेत. हे फेरबदल असे असतील की, ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. पण त्यांचे हे प्रचंड मोठे बदल कधी होणार आहे हे काही कळत नाही. दुसर्‍या बाजूला भाजपामध्येही काही फेरबदल अपेक्षित होते. कारण आम आदमी पार्टीचे आव्हान या पक्षाला जाणवत आहे. या आव्हानाशी तोंड देण्याकरिता भाजपाची काय तयारी आहे याचे दर्शन भाजपाच्या या अधिवेशनात तरी नक्कीच झालेले नाही. उलट आपच्या प्रभावामुळे भ्रष्टाचार निर्मूलनाचा नारा जोरात दिला पाहिजे असे बोलत असतानाच भाजपाने येडियुरप्पांना पुन्हा पक्षात घेतले आहे.

Leave a Comment