धुळे- जळगावच्या घरकुल घोटाळ्यातील प्रमुख संशयित आमदार सुरेश जैन यांच्या वैद्यकीय सुविधांबाबतच्या; तसेच आमदार गुलाबराव देवकर यांच्या जामिनाच्या अर्जावर सरकार पक्षाच्या वकिलांनी 24 जानेवारीला म्हणणे मांडावे, असा आदेश विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांनी आज दिला. दरम्यान, श्री. देवकर यांना घरचा जेवणाचा डबा देण्यास काही अटी- शर्तींवर न्यायालयाने आज मंजुरी दिली.
घरकुल खटल्यातील संशयित आमदार गुलाबराव देवकर, प्रदीप रायसोनी, राजा मयूर, जगन्नाथ वाणी यांच्यासह कालच कारागृहात दाखल झालेल्या आमदार सुरेशदादा जैन यांना येथील विशेष न्यायालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलिस व्हॅनमधून (एमएच 18/जी 0174) हजर करण्यात आले. प्रारंभी न्यायाधीश कदम यांनी पाचही संशयितांची हजेरी घेतली. यानंतर आमदार देवकर यांना घरचा जेवणाचा डबा मिळावा या संदर्भातील अर्जावर डब्याची तपासणी करावी, अशा अटी-शर्तींवर न्यायालयाने मंजुरी दिली. त्यानंतर देवकर यांच्यातर्फे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सरकार पक्षाने 24 जानेवारीपर्यंत आपले म्हणणे मांडावे, असा आदेश न्यायालयाने दिला.
सरकार पक्षातर्फे वकिलांनी म्हणणे मांडल्यानंतर त्या अर्जावरील कामकाज व युक्तिवाद कधी करायचा, याचा निर्णयही 24 जानेवारीलाच होण्याची शक्यता आहे. श्री. जैन यांच्यातर्फे वैद्यकीय सुविधांबाबत न्यायालयाला दिलेल्या अर्जात मधुमेहाची व हृदयरोगाशी संबंधित वैद्यकीय तपासणी करण्याचा कारागृह प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी विनंती केली. या अर्जावर सरकार पक्षाच्या वकिलांनी 24 जानेवारीला आपले म्हणणे मांडावे, असा आदेश न्यायालयाने दिला. 24 जानेवारीला सरकारी वकिलांनी म्हणणे मांडल्यानंतर 30 जानेवारीला या अर्जावर कामकाज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा कारागृह प्रशासनाकडून येथील विशेष न्यायालयाला वैद्यकीय अहवाल बंद लिफाफ्यात प्राप्त झाला आहे. तोही 24 जानेवारीला उघडला जाण्याची शक्यता आहे.
घरकुल खटल्यातील जे 49 संशयित जामिनावर आहेत, त्यांनाही आज येथील विशेष न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. या सर्व संशयितांबाबत सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून खटल्याला स्थगिती असल्याने व प्रत्यक्ष कामकाज सुरू नसल्याने 14 फेब्रुवारी 2014 पर्यंत न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित न राहण्याची मुभा दिली. दरम्यान, ऍड. तुळशीराम नेमाडे यांनी खटल्याचे कामकाज सुरू होईपर्यंत जामिनावरील संशयित सुनंदा रमेश चांदेलकर यांना प्रकृतिअस्वास्थ्यामुळे कामकाज सुरू होईपर्यंत कामकाजासाठी गैरहजर राहण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज दिला. त्यावरही 14 फेब्रुवारीला निर्णय होण्याची शक्यता आहे.