सोने दागिने निर्यातीत डिसेंबरमध्ये ३० टक्के घट

मुंबई – सोने दागिने निर्यातीत घट होण्याचे प्रमाण वाढत चालले असून चालू अर्थिक वर्षात २०१३-१४ मध्ये डिसेंबर महिन्यात हे प्रमाण ३०.४ टक्यांवर गेले असल्याचे समजते. जेम्स अॅन्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात ४४.३१ कोटी डॉलर्सचे दागिने निर्यात केले गेले असले तरी एप्रिल ते डिसेंबर या कालात निर्यातीत ५१.५ टक्के घट झाली आहे.

सरकारने सोने आयातीवर आणलेली बंधने आणि आयात सोन्यातील २० टक्के सोन्याची दागिने बनवून निर्यात करण्याचे बंधन यामुळे या व्यापारावर विपरित परिणाम झाला आहे असे कौन्सिलचे उपाध्यक्ष पंकज पारिख यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की हे निर्बंध आणण्यापूर्वी सोने दागिने निर्यातदार बँकांकडून नोशनल रेट ठरवून किती सोने हवे त्याच्या २० टक्के किमत भरून कर मुक्त सोने मिळवित असत. नंतर जवळच्या सोन्याचे दागिने निर्यात करत व त्याचे पैसे आले की उरलेली ८० टक्के रक्कम भरून करमुक्त सोने घेत असत. आता हे बंद पडले आहे.

निर्यातदारांकडे ऑर्डर मोठ्या प्रमाणावर आहेत मात्र जवळच्या सोन्याचे दागिने बनवून निर्यात करणे नवीन नियमानुसार शक्य होत नाही. कारण अशी निर्यात करून ड्यूटी फ्री सोने मिळत नाही त्यामुळे निर्यातीत घट होत आहे.