मुंबई- जागा वाटपाची चर्चा नंतर करू, आधी राज्यात वातावरण निर्मिती करू, असे सांगत शिवसेना व भाजपने आपले मित्रपक्ष असलेले आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षांना झुलवत ठेवण्याची भूमिका घेतली आहे. महायुतीच्या मुख्य समन्वय समितीची मंगळवारी रंगशारदा येथे झालेल्या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे या बैठकीत जागा निश्चिती होईल, या आशेने आलेल्या महायुतीतील नेत्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली.
लोकसभा जागा वाटपावर अंतिम निर्णय घेण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीला भाजप नेते गोपीनाथ मुंडे, आरपीआयचे रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उपस्थित होते. जागा वाटपांवर लवकर निर्णय झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका रामदास आठवले यांनी समन्वय समितीच्या बैठकीत मांडत सहा जागांची आपली मागणी पुढे रेटली. तसेच राजू शेट्टी यांनीही चार जागा मिळाल्या पाहिजेत, असे सांगितले. तर माढय़ाच्या जागेसाठी महादेव जानकर यांनी आग्रह धरला.
मित्रपक्ष आक्रमक होत असताना आणि एवढ्या जागा सोडणे शक्य नसल्याने भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी जागा वाटपाच्या मुद्दय़ालाच बगल दिली. ह्यजागा वाटप होईल पण त्याआधी वातावरण निर्मितीची गरज आहेह्ण, असे वक्तव्य करत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जागा वाटपाच्या मुद्दय़ाला बगल दिली. त्याला शिवसेनेनेही समर्थन दिल्याने बैठकीनंतरही जागा वाटपाचा प्रश्न ताटकळतच राहिला. जागा वाटपासाठी तीन जणांची समितीही स्थापन केली गेली. यामुळे निवडणुका तोंडावर आल्यानंतरही केवळ चर्चेची गु-हाळे सुरू राहणार असल्याने मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान २५ जानेवारीला मुंबईत महायुतीच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.