महायुतीची सत्ता आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करू- गोपीनाथ मुंडे

मुंबई- आगामी काळात महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करू, तसेच गेली तीन वर्षे राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याने शेतकरी वीज बिल भरू शकत नाहीत. त्यामुळे सरकारने त्याचे वीज बिल माफ करावे अन्यथा आमचे सरकार आल्यानंतर आम्ही विजेचे दर 50 टक्यांनी दर कमी करू, असे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी सुरूवात झाली आहे.

मुंबईत महायुतीच्या समन्वय समितीची जागा वाटपाबाबत महत्वाची बैठक आज सायंकाळी पार पडली. या बैठकीला भाजप, शिवसेना, आरपीआयचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रामदास आठवले, सुभाष देसाई, गजानन किर्तीकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत आदी नेते उपस्थित होते. या बैठकीची माहिती या सर्व नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. मुंडे यांनी सांगितले की, ही बैठक लोकसभेच्या जागा वाटपाबाबत होती. यात सविस्तर चर्चा झाली. भाजप, सेना, आरपीआय, स्वाभिमानी, रासप या महायुतीत सहभागी झालेल्या पक्षांच्या प्रमुखांना जागावाटपाचे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.

भाजपकडून मी (गोपीनाथ मुंडे) उद्धव ठाकरे, रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर यांची एक समिती स्थापन केली असून, राज्यातील सर्व 48 जागाच्या वाटपांचे अधिकार या पाच नेत्यांना असतील असे मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या 30 जानेवारीला महायुतीचा पहिला प्रचंड मेळावा इचंलकरजी येथे होईल. यात यूपीए सरकारने दिलेली आश्वासनांचा पर्दाफाश करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेनेने कोणत्या जागा लढवाव्यात, मागील निवडणुकीबाबतची माहिती, कोणत्या जागा अदलाबदली करता येतील व कोणाची कोणत्या मतदारसंघात ताकद कमी अधिक वाढली आहे यावर सविस्तर चर्चा झाली. याचबरोबर महायुतीत सामील झालेल्या आरपीआयला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या, याचबरोबर स्वाभिमानीला हातकणंगलेसोबत आणखी कोणती एक जागा द्यायची.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना माढामधून तिकीट द्यायचे की बारामतीमधून यावर निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकर यांना माढातून उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच स्वाभिमानीला बारामती सोडण्याचा विचार झालेला आहे. याचबरोबर कोल्हापूरमधून सदाशिवराव मंडलिक जर अपक्ष लोकसभेला उभे राहिले तर स्वाभिमानीच्या कोट्यातून महायुती मंडलिक यांना पाठिंबा देऊन तेथे उमेदवार उभा न करण्याचा पर्याय तपासला जात आहे. यामुळे राष्ट्रवादीला अडचण निर्माण करण्यात राजू शेट्टी यशस्वी होतील असे यामागे गृहीतक आहे. मात्र, मुन्ना महाडिक यांनी शेट्टींना मागील काळात मदत केल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेट्टी मुन्ना यांच्या अडचणी वाढविण्याची शक्यता कमी आहे. मात्र, अशी ऑफर देऊन सेना-भाजप स्वाभिमानीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकते. तसेच बारामती सेनेच्या विजय शिवतारे यांना उतरवून सुप्रिया सुळेंना आव्हान निर्माण करण्याचे सेनेचे प्रयत्न आहेत.

Leave a Comment