मिशेल ओबामांचा ५० वा वाढदिवस शुक्रवारी

वॉशिग्टन- फर्स्ट लेडी मिशेल ओबामा आपला ५० वा वाढदिवस शुक्रवारी साजरा करत आहेत. या वाढदिवसाचे वर्णन त्यांनी फिफ्टि अॅन्ड फॅब्युलस असे कले आहे. शनिवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्हाईट हाऊसमध्ये समारंभ आयोजित केला गेला आहे आणि यावेळी नृत्यपार्टी केली जाणार आहे असेही समजते.

आपल्या ५० व्या वाढदिवसाविषयी बोलताना मिशेल म्हणाल्या की आयुष्याची हाफ सेंच्युरी मी गाठते आहे पण बराक यांचे अध्यक्षपद उमेदवारीचे दिवस संपल्याने खूप मोकळे वाटते आहे. पाच वर्षांपूर्वी फर्स्ट लेडी बनलेल्या मिशेल यांनी ओबामा यांच्या निवडीसाठी प्रचाराचा धडाका लावला होता आणि त्यासाठी टीकाही सहन केली होती. स्वतःवर कधीच इतका विश्वास मला वाटला नव्हता असेही त्या म्हणाल्या.

यापूर्वी फर्स्टलेडी बनलेल्या प्रत्येक फर्स्टलेडी प्रमाणेच मिशेल यांच्या प्रत्येक हालचालीवर प्रसारमाध्यमांची कडक नजर होती. अनेक वेळा त्यांना टीकेला सामोरे जावे लागले मात्र एकमुखाने सर्वच प्रसारमाध्यमांनी त्यांना मलिया आणि साशा या दोन मुलींची योग्य काळजी घेतल्याबद्दल गौरविलेही आहे. मिशेल यांनी फर्स्ट लेडी बनतानाच मुलींची आई ही माझी पहिली भूमिका असल्याचे सांगून त्याप्रमाणे वर्तनही केले होते आणि मुली कळण्याच्या वयाच्या झाल्यानंतरच बाहेरच्या कार्यावर लक्ष दिले होते.