अजित पवारांना आली जाग

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने अरविंद केजरीवाल यांची नक्कल करीत आपली कार्यक्षमता वाढवण्यास सुरूवात केली आहे. वेगाने निर्णय घेतल्याशिवाय लोक आपल्याला जवळ करत नाहीत याचा अनुभव त्यांना येत आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता आठवड्यातून दोनदा होणार आहे. अजित पवार यांनी तसा आग्रह धरला आहे. आठवड्यात दोनदाच काय पण सातवेळा जरी बैठक घेतली तरी आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार असा प्रश्‍न शिल्लक राहणार आहे. ज्यांच्या स्वभावात, वर्तनात आणि रक्तात मुळी कार्यक्षमता नाहीच त्यांनी कितीही बैठका घेतल्या तरी त्यांचा कारभार कधीच कार्यक्षमतेचा होणार नाही. बारा महिने आळसात झोपणारा पैलवान कुस्ती जाहीर झाल्यानंतर व्यायाम करायला लागतो तेव्हा त्याचा पराभव अटळ असतो. कुस्तीची तारिख जाहीर झाल्यानंतर एकदमच खुराक सुरू झाला तर त्या खुराकाने ताकद वाढण्याऐवजी हागवण लागण्याचीच जास्त शक्यता असते. पण अजित पवार आदी राष्ट्रवादी नेते आता जागे झाले असल्याने त्यांची अवस्था बारा महिने झोपा काढणार्‍या त्या पैलवानासारखी होणार आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीने मिळवलेल्या यशाचा हा महाराष्ट्रावर झालेला एक परिणामच आहे मग शरद पवार असा परिणाम होणार नाही असे कितीही दावे करोत.

अरविंद केजरीवाल यांनी निम्मा दरात वीज आणि मोफत पाणी हे दोन निर्णय सत्तेवर आल्यानंतर ४८ तासाच्या आत घेतले. शिवाय भ्रष्टाचार निर्मूलनासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली. दिल्लीमध्ये खूप लोक निराधार आहेत, त्यांना घरे नाहीत. अशा लोकांना घरे बांधून देण्याचा कार्यक्रम तर राबवला जाणार आहेच, पण शहरामध्ये अनेक ठिकाणी दिल्ली परिवहनच्या बसगाड्या नादुरुस्त होऊन पडलेल्या आहेत त्या बसगाड्यांमध्ये अशा लोकांना राहता येईल, अशी एक सोय या सरकारने केली आहे. अशा प्रकारचे विलक्षण कल्पक निर्णय अरविंद केजरीवाल घेत आहेत. त्यांच्या डोक्यातून अजून काय काय युक्त्या बाहेर पडणार आहेत हे माहीत नाही, परंतु त्यांच्या या योजनांमुळे सामान्य नागरिकांना काही प्रश्‍न सतावत आहेत. आजपर्यंत सत्तेवर असलेल्या अन्य सरकारांना अशा गोष्टी का करता आल्या नाहीत असा एक प्रश्‍न समोर आला आहे. आजपर्यंतचे राज्यकर्ते हे बथ्थड डोक्याचे होते किंवा त्यांना जनतेसाठी काही करण्याची कल्पनाच सुचत नव्हती असा या गोष्टीचा अर्थ होतो आणि बर्‍याच अंशी ही गोष्ट खरी आहे. अरविंद केजरीवाल यांना निराधार लोकांना नादुरुस्त बसमध्ये राहता येईल ही युक्ती सुचली.

सार्‍या देशामध्ये अशा हजारो नादुरुस्त बसगाड्या पडलेल्या असतील आणि लाखो लोक बेघर असतील. मुंबईत तर दोन कोटी लोकसंख्येपैकी ४० लाख लोकांना घर नाही. ते उड्डाण पुलांच्या खाली राहतात, फुटपाथवर झोपतात, रेल्वे स्थानकाच्या आसपास जमेल तेथे पथारी पसरून झोपतात. या लोकांच्या या अवस्थेला आपला नियोजनशून्य कारभारच जबाबदार आहे असे तर आजवरच्या कोणत्याही मंत्र्याला वाटलेच नाही. पण त्यांची ती अवस्था ओळखून काही तरी चांगली सोय केली पाहिजे, अशीही तळमळ वाटलेली नाही. एकंदरीत आपण जनतेच्या कल्याणाची शपथ घेऊन सत्तेवर येतो, परंतु ते खरे नसते; जनतेला अशा थापा देऊन निवडून आले पाहिजे आणि एकदा निवडून आल्यानंतर स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या कल्याणासाठीच सत्ता वापरली पाहिजे असाच या सार्‍या नेत्यांचा व्यवहार राहिलेला आहे. त्यांच्यासाठी जनतेचे कल्याण हे निवडणुकीत निवडून येण्यासाठी लोकांना दाखवायचे गाजर असते. त्यामुळे प्रत्यक्षात ते तळमळीने काहीच करत नाहीत. निवडणुकीत गरिबी हटविण्याच्या घोषणा केल्या तरी प्रत्यक्षात गरिबी हटवायची नसते. कारण लोकांची गरिबी खरोखर हटली तर ते शहाणे होतील आणि आपल्याला पुन्हा मते देणार नाहीत अशी भीती या पुढार्‍यांना वाटत असते.

लोकांना फार शहाणे करू नका, ते जितके अज्ञानी असतील तितके ते फोडा आणि राज्य करा या आपल्या नीतीला सहज बळी पडून आपल्याला मते देत राहतील ही आजवरची राज्यकर्त्यांची नीती राहिलेली आहे. या लोकांनी जनतेच्या कल्याणाच्या योजना आखल्या खर्‍या, परंतु त्या प्रामाणिकपणे राबवल्याही नाहीत आणि प्रत्येक निवडणुकीला एक घोषणा पुढे करून, लोकांना आमिषे दाखवून, त्यांची मते मिळवून सत्ता काबीज केली. जनतेला हे कळायला लागले आहे. म्हणून गेल्या महिन्यात झालेल्या चार राज्यातल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेत्यांना एक साक्षात्कार झाला की, अशा योजनांमुळे आता मते मिळत नाहीत. आता या लोकांना कोणती युक्ती करून निवडून यावे या प्रश्‍नाने ग्रासले आहे. दिल्लीमध्ये केजरीवाल का निवडून आले आणि आपण काय करावे, या गोष्टीने ते एवढे व्यग्र झाले आहेत की, अरविंद केजरीवाल यांच्या कोणत्या निर्णयाची कॉपी करावी याच्याच चिंतनाने त्यांना वेढून टाकले आहे. केजरीवाल यांना भ्रष्टाचार विरोधामुळे मते मिळाली आहेत असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटते. म्हणून त्यांनी राहुल गांधींची भ्रष्टाचारविरोधी प्रतिमा तयार करायला सुरुवात केली आहे. पण अशा प्रतिमांचा काही उपयोग होत नसतो. भ्रष्टाचाराचा विरोध त्याच्या स्वभावात असावा लागतो. ती त्याची जीवननिष्ठा असावी लागते. जन्मभर भ्रष्टाचारात लोळायचे आणि निवडणुकीत गांधी टोपी घालायची हे सोंग काही लोकांना फसवू शकते, पण सार्‍या जनतेला अनेक वर्षे फसवू शकत नाही.

Leave a Comment