महायुतीला मिळाला चौथा साथीदार

मुंबई - लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) महायुतीने आणखी एका जोडीदाराला सोबत घेण्याचे निश्चित केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शट्टी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीबरोबर राहाणार असल्याचे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील महागर्जना रॅलीत शिवसेनेला अनुल्लेखाने टाळून भाजपने शिवसेनेच्या एका मोठ्या गटाचा रोष ओढवून घेतला आहे. भाजपशी असलेली युती तोडावी, असा आग्रह या गटाकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) मातोश्रीवर महायुतीची बैठक झाली आहे. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांना निमंत्रण देण्यात आले होते.  महायुतीत नवा सहकारी जोडण्यासाठी ही बैठक असल्याची चर्चा होती.  बैठकीनंतर ती खरी ठरली आहे. बैठकीला सुरवात झाली तेव्हा शिवसेना, भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टीच उपस्थित झाले होते. माध्यमांमध्ये रिपाई नेते रामदास आठवले यांना या बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याची बातमी आल्यानंतर त्यांना बालोवण्यात आले आहे. रामदास आठवले यांना बैठकीचे निमंत्रण न दिल्यामुळे रिपाईचे कार्यकर्ते नाराज असल्याची बातमी होती. मात्र, लवकरच आठवले मातोश्रीवर येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.  मातोश्रीवर झालेल्या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते विनोद तावडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा 
खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत दोन जागा सोडण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राजू शट्टी यांचा हातकणंगले आणि माढा हे दोन मतदारसंघ खासदार शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचे निश्चित झाले आहे.

 

Leave a Comment