बांगला देशात आवामी लीगला बहुमत

ढाका – बांगला देशात झालेल्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी आवामी लीग पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. रविवारी या निवडणुकीचे मतदान झाले. विरोधी बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्यामुळे मतदान कमी झाले आणि मतदानाच्या वेळी हिंसाचार होऊन २१ जणांचे बळी गेले.

बर्‍याच मतदारांनी घरातच राहणे पसंत केले. कारण त्यांना हिंसाचाराची भीती वाटत होती. देशात ५९ जिल्हे असून ३०० मतदारसंघ आहेत आणि त्यातल्या १४७ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे. बाकीच्या १५३ मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले जाणार आहे. मतदान झालेल्या १४७ मतदारसंघात सत्ताधारी पक्षाने ९५ जागा जिंकल्या आहेत. देशाच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी गोपाळगंज आणि रंगपूर या दोन मतदार संघातून विजय मिळविला आहे.

विरोधी बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्या खालेदा झिया यांनी निवडणुकीच्या आधी देशाचा कारभार नि:पक्षपाती सरकारच्या हाती द्यावा आणि त्या सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणुका घेतल्या जाव्यात अशी मागणी केली होती. पण ही मागणी ङ्गेटाळली गेल्यामुळे त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. ही निवडणूक एकतर्ङ्गी होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.