खोब्रागडे यांच्या तपासणीसंदर्भातील चित्रफित बनावट

वॉशिंग्टन- भारताच्या उप महावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेनंतर त्यांची कपडे काढून करण्यात आलेल्या तपासणीसंदर्भातील चित्रफित सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मात्र ही चित्रफित बनावट व चिथावणीखोर असून, ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे अमेरिकेने शनिवारी स्पष्ट केले. सोशल मीडियावर दाखवण्यात येत असलेली चित्रफित ही देवयानी यांची नसून ती बनावट आहे.

या चित्रफितीची सत्यता न पडताळताच ती दाखवण्यात येत असल्याचे अमेरिकेच्या प्रवक्त्या मेरी हार्फ यांनी सांगितले. हा प्रकार धोकादायक असून, बेजाबदारपणे ही चित्रफित बनवणा-यांचा शोध आम्ही घेऊ असे सांगत त्यांनी या चित्रफितीसंदर्भात आम्ही मार्शल सव्‍‌र्हिससोबत चर्चा केली असून, त्यांनीही ही चित्रफित बनावट असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर दाखवण्यात येत असलेल्या या चिथावणीखोर व बनावट चित्रफितीमध्ये तपासणी करण्यात येत असलेली महिला आरडाओरडा करताना दिसत आहे.

अमेरिकी दूतावासातील सेंटरमध्ये परवान्याशिवाय चित्रपट दाखवण्यात येऊ नये, असे आदेश देत सेंटरमध्ये दाखवण्यात येणा-या चित्रपटांवर भारताने निर्बंध घातले. तसेच हा परवाना २० जानेवारीपर्यंत मिळवण्यात यावा, अन्यथा सेंटर बंद करण्यात येईल, असा इशाराही दिला. आमंत्रित पाहुण्यांसाठी सेंटरमध्ये चित्रपट दाखविले जातात. पण चित्रपट दाखवण्यासंदर्भात सेंटरकडे कोणताचा परवाना नाही. दिल्लीतील अमेरिकी संस्थांमध्ये होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनाबाबत भारताने सेंटरवर कारवाईचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.