आमच्या इतिहासाची मांडणी चुकीची

रायगड – ‘भारताच्या तेजस्वी इतिहासाची मोडतोड करून इंग्रजांनी जे आपल्यापुढे मांडले, त्यालाच स्वातंत्र्यानंतर खतपाणी घातले गेले. काही लोकांनी भारताचा खरा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचूच दिला नाही,’ असे सांगत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी किल्ले रायगडावरून काँग्रेसच्या ५० वर्षांच्या राजवटीवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली.

सांगलीतील ‘शिव प्रतिष्ठान’ने आयोजित केलेल्या ‘महानगड ते रायगड’ यात्रेचा समारोप रविवारी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मोदी यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांच्या उज्ज्वल इतिहासाचा गौरव केला. दुष्काळाच्या समस्या असोत, देशाच्या सीमांचे संरक्षण असो, ग्लोबलायझेशनला सामोरे जाण्याचा पेच असो, शिवरायांचे ३५० वर्षांपूर्वीचे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, सुशासन आजच्या काळातही मार्गदर्शक आहे. मात्र, इतिहासाने शिवरायांच्या विराट रूपाला केवळ योद्ध्याच्या प्रतिमेत बंदिस्त करून टाकलं आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘शिव प्रतिष्ठान’चे प्रणेते संभाजी भिडे गुरुजी हेही यावेळी उपस्थित होते. ‘सुरत मोहिमेत शिवरायांना स्थानिक लोकांचंही सहकार्य मिळालं. त्यामुळेच त्यांना औरंगजेबाचा खजिना लुटता आला. मात्र, या घटनेचे वर्णन इतिहासकारांनी ‘सुरत लुटली’ असे केले आहे. हे इतिहासाचे विकृतीकरण असून शिवरायांचा घोर अपमान आहे, असेही मोदी म्हणाले.

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर पत्रकार परिषदेत मोदींवर टीकास्त्र सोडले होते. ‘मोदी पंतप्रधान झाल्यास देशावर अनर्थ ओढवेल,’ असे मनमोहन सिंग म्हणाले होते. रायगडावरील भाषणातून मोदी पंतप्रधानांच्या या टीकेचा समाचार घेतील, अशी अटकळ होती. मात्र, मोदींनी थेट कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे टाळले.

Leave a Comment