एसी, फ्रिज महागणार

मुंबई – पुढील आठवड्यापासून एसी आणि फ्रिजच्या किंमती ३५०० ते ५००० रूपयांनी वाढणार असल्याचे उत्पादक कंपन्यांनी जाहीर केले आहे. एनर्जी रेटिंग बाबतचे नियम अधिक कडक करण्यात आल्याने या वस्तूंच्या उत्पादन किमती वाढणार असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

ब्यरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ने एसी आणि फ्रिजसाठी असलेली लेव्हल वन आणि टू साठीची उर्जा मानके बंधनकारक केली आहेत आणि त्या काही बदलही केले आहेत.  पूर्वीच्या नियमांनुसार फाईव्ह स्टार रेटिग असलेला एसी, फ्रिज सर्वाधिक उर्जा बचत करणारे समजले जात होते. मात्र आता नवीन मानकांप्रमाणे हे फाईव्ह स्टार एसी फोर स्टार ठरणार आहेत तर फाइव्ह स्टार फ्रिज थ्री स्टार मानले जाणार आहेत. यामुळे या दोन्ही वस्तूंच्या निर्मितीत कांही तांत्रिक सुधारणा कराव्या लागणार असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे  परिणामी उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.

एसी आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या किमतीत यामुळे १५ टक्के वाढ केली जाणार आहे. फाईव्ह स्टार स्प्लीट एसी दीड टनाचा ३५ ऐवजी ४० हजारांना मिळेल तर दोन स्टार एसी २५५०० ऐवजी २९ हजारांना पडेल. फ्रॉस्ट फ्री २४० लिटरचा फ्रिज २० ऐवजी २६ हजारांना तर दोन स्टार फ्रिज १४ ऐवजी १८ हजारांना पडेल. सिगल डोअर फ्रिजच्या किमतीत मात्र कोणतेही बदल होणार नाहीत कारण त्यांना एनर्जी रेटिंग बंधनकारक नाही असेही सांगितले जात आहे.