पाकिस्तानी शरियतला प्रथमच मिळाली महिला जज्ज

इस्लामाबाद – पाकिस्तानी शरीयत न्यायालयाला ३३ वर्षांत प्रथमच महिला जज्ज मिळाली आहे. ५६ वर्षीय अशरफ जहाँ यांची या न्यायालयात जज्ज म्हणून नियुक्ती करण्यात आली असून इस्लामी कायद्याखाली येणार्‍या दाव्यांवर त्या निर्णय देणार आहेत. त्यांनी यापूर्वी सिंध हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.

पाकिस्तानचे हुकुमशहा झिया उल हक यांच्या कार्यकाळात १९८० मध्ये पाकिस्तानात शरीयत न्यायालयांची स्थापना करण्यात आली होती. पाकिस्तानी संस्थांचे इस्लामीकरण करण्यासाठी हे पाऊल झियांनी उचलले होते असे सांगितले जाते. या न्यायालयात सुनावणी होणारे दावे हुदद कायद्याखाली सुनावणीस येतात. हुदद कायदा ही पाकिस्तानातील समांतर न्यायव्यवस्था आहे असेही समजते.