मनमोहनसिंग ३ जानेवारीला राजीनामा देणार?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांना आता केवळ कांही महिन्यांचाच अवधी असताना भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग हे ३ जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त टेलिग्राफने दिले आहे  मनमोहनसिंग यांनी यापूर्वीच पंतप्रधानपदावरून निवृत्त होऊन पक्ष कार्यात मदत करण्याचे तसेच राहुल गांधींना मार्गदर्शन करण्याची इच्छा सोनियांकडे व्यक्त केली आहे. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही काँग्रेसने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत नुकतेच व्यक्त केल्याने मनमोहनसिंग यांच्या राजीनामा वृत्ताला दुजोराच मिळत असल्याचे जाणकरांचे मत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी १७ जानेवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्यावेळी राहुल यांच्या नावाची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली जाईल असे अंतर्गत सूत्रांकडून समजते. भ्रष्टाचार, घोटाळे, महागाई ही काँग्रेससमोरची मुख्य आव्हाने आहेत तसेच यंदा प्रथमच १५ कोटी युवा मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील ८० ट्क्के म्हणजे १२ कोटी मतदारांना काँग्रेस नापसंत असल्याचे विविध सर्वेक्षणातून दिसून आले आहे या युवा मतदारांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्यात राहुल यशस्वी होतील का हाही काँग्रेसपुढे मोठा प्रश्न आहे. नुकत्याच नऊ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकात केवळ कर्नाटक आणि मिझोराम या दोन राज्यातच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळविता आले आहे.

Leave a Comment