पंतप्रधान राजीनामा देणार नाहीत

नवी दिल्ली- पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा असून ते नव्या वर्षात ३ जानेवारीला याबाबत घोषणा करु शकतात. परंतु, कॉंग्रेसने राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. प्रवक्ते मनीष तिवारी यांनी यासंदर्भात प्रतिक्रीया देताना सांगितले, की पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबतचे वृत्त चुकीचे आहे.

कॉंग्रेसकडून योग्यवेळी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. कॉंग्रेसकडे नेतृत्त्वाची कमतरता नाही. इंग्रजी वृत्तपत्र ’द टेलिग्राफ’ने मनमोहनसिंगांच्या राजीनाम्याबाबत वृत्त दिले आहे. मनमोहनसिंग यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधापद सोपविण्यात येऊ शकते. याबाबत कॉंग्रेसमध्ये मतभिन्नताही आहे, असे या बातमीत म्हटले आहे. परंतु, जेमतेम ६ महिन्यांसाठी राहुल गांधींकडे पंतप्रधानपद सोपवावे का, याबाबत कॉंग्रेसमध्ये खलबते सुरु आहेत.

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयातील सुत्रांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही. परंतु, मनमोहनसिंगांच्या राजीनाम्याची चर्चा मात्र जोरात सुरु झाली आहे. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही सोमवारी सांगितले होते, की कॉंग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे. तर, स्वतः मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदाच्या तिस-या टर्मसाठी इच्छुक नसल्याचे म्हटले होते. त्यांनी राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचेही म्हटले होते. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, योग्यवेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

कॉंग्रेसचे अधिवेशन १७ जानेवारीला होणार आहे. त्यात राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक ५ महिन्यांवर आली आहे. कॉंग्रेस आणि युपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत. देशभरात कॉंग्रेसविरोधी वारे वाहत आहे. अशा स्थितीत युपीए सरकार पुन्हा सत्तेवर येईल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मनमोहनसिंग आताच राजीनामा देतील आणि राहुल गांधींना पंतप्रधानपद केले जाईल, याबाबत राजकीय विश्‍लेषकांमध्ये दुमत आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये मनमोहनसिंग यांना नेते म्हणून कॉंग्रेसने फारसे पुढे केलेले नाही. गेल्या निवडणुकीवेळी वेगळे चित्र होते. मनमोहनसिंग यांनाच कॉंग्रेसने नेते म्हणून कायम पुढे केले होते. यावेळेस तसे चित्र नाही. अलिकडच्या काळात केंद्र सरकारमध्ये राहुल गांधींचे वर्चस्व वाढत असल्याचे दिसून आले. त्यावरुन कॉंग्रेस हळूहळू राहुल गांधींना समोर करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते.

 

Leave a Comment