खळबळजनक पण उद्बोधक

२०१३ हे वर्ष कसे गेले असा प्रश्‍न कोणी विचारला तर एकदम उत्तर देता येणार नाही पण हे वर्ष बर्‍याच अंशी खळबळजनक ठरले असे नक्कीच म्हणता येईल. मात्र ही खळबळ निष्कारण नव्हती. तिच्यात बरेच काही होते. नवे प्रवाह निर्माण करणारे काही प्रसंग त्यात होते आणि समाजातली वैचारिक घुसळण स्पष्ट करणारेही काही होते.
सरत्या वर्षामध्ये भारतामध्ये राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अशा तिनही क्षेत्रामध्ये मोठ्या खळबळजनक आणि दूरगामी परिवर्तनाचे संकेत देणार्‍या घटना घडल्या आहेत. तसे प्रत्येक वर्ष काळाच्या पटलावर आपली एक विशिष्ट निशाणी ठेवून जातच असते. परंतु २०१३ या वर्षाने अशा अनेक खुणा ठेवलेल्या आहेत. मर्यादित जागेमध्ये अशा सगळ्या घटनांचा आढावा घ्यायचा ठरवले तर थोडक्यात घ्यावा लागेल आणि त्यात सर्वात आधी उल्लेख करावा लागेल केंद्रातल्या युपीए सरकारचा. २०१४ साली या सरकारचे भवितव्य ठरणार आहे आणि त्यादृष्टीने २०१३ हे वर्ष निर्णायक होते. पण हे वर्ष सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला आणि आघाडीला विश्‍वासार्हता गमावणारे वर्ष ठरले. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचे ङ्गास या सरकारच्या गळ्याभोवती आवळले गेलेच पण आजपर्यंत या ङ्गासापासून दूर असणारे पंतप्रधान मनमोहनसिंग कोळशाच्या भ्रष्टाचारात या ङ्गासाच्या जवळ गेले. मनमोहनसिंग आपली विश्‍वासार्हता गमावून बसले.

कॉंग्रेस पक्षाला १६ व्या लोकसभेत विजय मिळवायचा असेल तर मनमोहनसिंग यांची प्रतिमा ङ्गारशी उपयुक्त ठरणार नाही याची जाणीव झालेल्या कॉंग्रेस पक्षाने हळूहळू करीत का होईना पक्षाला सत्तेवर नेऊ शकणारा नेता म्हणून राहुल गांधी यांना पुढे आणले. दुसर्‍या बाजूला २०१३ याच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले. त्यांची ही एन्ट्री राजकारणाच्या नाटकात मोठीच खळबळजनक ठरली. भारतीय जनता पार्टीच्या प्रचार यंत्रणेने नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा मोठ्या हिकमतीने आयोजित केल्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या भोवती लोकप्रियतेचे वलय निर्माण करण्यात त्यांना यश आले. राजकारणातल्या चर्चांचा केंद्रबिंदू हाच राहिला. या संदर्भात कॉंगेसचे नेते खूप मागे पडले. प्रचारातली आक्रमकता आणि कल्पकता यामुळे नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना अस्वस्थ करून सोडले. त्यांचा हा प्रभाव खरोखरच किती खरा आहे. याची परीक्षा राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुकांंमध्ये झाली.

चारपैकी तीन राज्ये भारतीय जनता पार्टीने जिंकली. त्याचे कौतुक होण्याची अपेक्षा होतीच परंतु दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने अनपेक्षितपणे २८ जागा मिळविल्यामुळे भाजपाचे कौतुक बाजूला राहून अरविंद केजरीवालच ‘पॉलिटिकल मॅन ऑङ्ग द इयर’ ठरले. सरत्या वर्षात घडलेले मोठे परिवर्तन एका शोकात्म घटनेमुळे घडले. २०१२ हे वर्ष संपता संपता दिल्ली झालेल्या एका सामूहिक बलात्कारामुळे देशभर वादळ उठले. महिलांची सुरक्षितता, त्यांचा सन्मान आणि त्या संबंधातले कायदे या निमित्ताने देशभर एक अभूतपूर्व जागृती झाली. बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद असलेला कायदा हे या सार्‍या जागृतीचे ङ्गलित ठरले. आपल्यावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात महिला संघटितपणे आणि आक्रमकपणे उभ्या राहत असलेल्या या वर्षात दिसल्या. मात्र त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराची प्रकरणेसुध्दा तेवढ्याच जोरकसपणे समाजासमोर आली. वर्षभरातल्या सामाजिक घटनांमध्ये भारतीय दंडविधान संहितेचे ३७७ वे कलम हे केंद्रभागी राहिले. भारतीय संस्कृतीचे अनैसर्गिक ठरवलेल्या समलिंगी संबंधांना प्रतिबंध घालणारे हे कलम बदलले पाहिजे. अशा मागणीने जोर धरला. या मागणीवर समाजाच्या मोठ्या वर्गाने मौन पाळले आणि काही संघटना समर्थनार्थ पुढे आल्या. त्यातून समाजातला एक बदल दृग्गोचर झाला.

महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्याने समाजाच्या उत्कषार्थ सुरू असलेले ४० वर्षांचे एक प्रखर वैचारिक आंदोलन मोठ्या दुर्दैवीरित्या संपले. सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या खटल्यात शिक्षा झालेल्या राजकीय नेत्याला या शिक्षेविरुध्द अपील केले तरी आपले पद आधी गमवावे लागेल असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि काही राजकीय घटनांनंतर हा निर्णय कायम होऊन भ्रष्ट नेत्यांना दहशत बसली. वर्ष संपता संपता संसदेत लोकपाल कायदा मंजूर झाला. ही या वर्षातली सर्वात मोठी घटना आहे खरी परंतु कायद्याच्याबाबतीत जाणकार असलेल्या सर्वांनाच मंजूर झालेले हे विधेयक ङ्गारसे आवडलेले नाही. संपत आलेल्या वर्षामध्ये आर्थिक क्षेत्रातल्या काही घटनाही आपल्या अस्तित्व दाखवून गेल्या. त्यातली सर्वात मोठी घटना म्हणजे रुपयाचे गडगडणे. २०१३ या एका वर्षामध्ये रुपया एका डॉलरला ४८ रुपयापासून तो ७० रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे देशातली आधीच अस्तित्वात असलेली महागाई सामान्य माणसाला खरोखरच तापदायक ठरली. मुक्त अर्थव्यवस्थेच्या वाटचालीमध्ये हे वर्ष वाईट गेले. देशाचे वट्ट राष्ट्रीय उत्पन्न केवळ ६ टक्क्यांनी वाढले.

Leave a Comment