अमेरिकन लष्करी विभागात लैंगिक शोषण घटनांत वाढ

वॉशिंग्टन – पेंटागॉनचे नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात अमेरिकन मिलिटरी विभागात २०१२ च्या तुलनेत २०१३ मध्ये लैंगिक शोषणाच्या घटना ५० टक्कयांवर गेल्या असल्याचे म्हटले गेले आहे. हा प्राथमिक अहवाल पेंटागॉनचे आक्टोबर २०१२ ते सप्टेंबर २०१३ या वर्षासाठी जाहीर केला आहे. या काळात ५ हजाराहून अधिक असे प्रकार घडले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी यू.एस.मिलीटरी तील प्रमुखांना लैंगिक शोषणाबाबतच्या घटनांचा रिव्ह्यू घेण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर हे निरीक्षण नोंदविले गेले आहे. पेंटागॉनमधील लेफ्टनंट कर्नल कॅथरिन विल्किन्सन या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाल्या की या प्रकारच्या घटनांना ज्या महिलांना बळी जावे लागते आहे त्या पुढे होऊन तक्रारी नोंदवत आहेत. आजपयंत असे प्रकार घडत होते मात्र त्याविषयी वाच्यता केली जात नव्हती.

लैंगिक शोषणात नको असतानाच स्पर्श करण्याच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक असून २०१२ मध्ये अशा २६ हजार केसेस झाल्या होत्या व त्याची गंभीर दखल घेऊनच त्याविरेाधात सुधारणांची मागणी झाली होती. या सुधारणांचेच पुढे कायद्यात रूपांतर केले गेले. त्यानुसार आता बलात्कार अथवा अन्य प्रकारच्या लैगिंक शोषणाबाबत तक्रार नोंदविण्याची मुदत पाच वर्षे करण्यात आली असून ज्याच्याविरेाधात तक्रार झाली असेल तो दोषी आढळल्यास त्याला कोर्ट मार्शल न्यायानुसार शिक्षा सुनावली जाणार आहे.