झारखंडात भ्रष्ट चौकडी

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूंचा राजद पक्ष आणि कॉंग्रेस यांची युती झाली होती. परंतु लालूंनी कॉंग्रेसच्या नेत्यांना गुंडाळून आपल्या मनानेच जागा वाटप केले. राज्यातल्या ४२ पैकी चार जागा कॉंग्रेसला दिल्या. त्यावर राजदच्या एका नेत्याने कॉंग्रेसला चार जागा कशाला असा प्रश्‍न लालूंना विचारला. तेव्हा लालूंनी उत्तर दिले, चार जण कॉंग्रेसची तिरडी उचलायला. हा किस्सा त्यावेळी खूप गाजला होता. हे उत्तर देताना लालूप्रसाद यादव प्रचंड गुर्मीत होते. त्यांची गुर्मी उतरली पण आता त्यांच्यावर हे चार जण कशाला असा प्रश्‍न वेगळ्या संदर्भात विचारण्याची पाळी आली आहे. याच लालूंनी आता झारखंडमध्ये शिबू सोरेन, कॉंग्रेस, लालूप्रसाद आणि मधु कोडा अशा चार भ्रष्टाचार्‍यांची चौकडी एकत्र आणली आहे. त्यांनी ही चार माणसे आता कोणाची तिरडी उचलण्यासाठी जमा केली आहेत असा प्रश्‍न त्यांना विचारला जाऊ शकतो. अर्थात, या प्रश्‍नाचे तिरकस किंवा कुजके उत्तर देण्याइतक्या गुर्मीत आता लालूप्रसाद राहिलेले नाहीत. मात्र त्यांनी झारखंडमध्ये पुढाकार घेऊन अगदी निवडून आणलेले चार गट एकत्र केले आहेत.

महाराष्ट्रातल्या आदर्श भ्रष्टाचाराच्या पाठोपाठ आता जलसिंचन घोटाळ्याचा अहवाल प्रसिध्द होणार आहे. आदर्श प्रकरणात राष्ट्रवादीचा कोणी नेता गुंतलेला नाही आणि जलसिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीशिवाय कोणीही गुंतलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस परस्परांचा शंभर टक्के सहभाग असलेले हे दोन्हीही घोटाळे दाबून टाकणार आहेत. मात्र लोकपाल विधेयकाशी विसंगत असलेले हे वर्तन करताना कॉंग्रेसच्या नेत्यांना थोडाही संकोच वाटणार नाही. तसा त्यांचा स्वभाव नाही. भ्रष्टाचार दडपणे हा त्यांचा स्थायीभाव आहे आणि भ्रष्टाचाराच्या आधारावरच सत्ता कशी प्राप्त करावी यात ते तरबेज आहेत. लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात शिक्षा झाली असूनही त्यांच्या गळ्यात तर कॉंग्रेसचे गळे घातले जात आहेतच. परंतु लालूंनी आपल्या सोबत आता मधु कोडा यांना आणले आहे आणि लवकरच मधु कोडा झारखंडमध्ये एका विशेष कार्यक्रमात कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये झारखंडात लालूप्रसाद यादव, मधु कोडा, झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबु सोरेन आणि कॉंग्रेस अशी चौकडी एकत्र येणार आहे. चौकडीला चांडाळ चौकडी का म्हणतात हे माहीत नाही परंतु झारखंडमधल्या या आगामी युतीला चांडाळ चौकडी हे तंतोतंत लागू पडते. कारण ही चौकडी गुन्हेगारांची चौकडी आहे.

यातले लालूप्रसाद यादव यांना तर न्यायालयाने शिक्षाच सुनावलेली आहे. शिबु सोरेन यांनाही खुनाच्या आरोपातील आरोपी असताना मनमोहनसिंग यांनी कोळसा खाते दिले. या खात्यात सरकारी यंत्रणेला वगळून शिबु सोरेने यांच्या मर्जीतील कंत्राटदारांची पर्यायी समांतर यंत्रणा कशी काम करत होती हे आता कोळसा खाण भ्रष्टाचार प्रकरणातून उघड झालेच आहे. या शिबु सोरेन यांना चक्क खुनाच्या प्रकरणात शिक्षा झाली आहे. पण त्यांचा हा अपराध पोटाशी घालून कॉंग्रेसने त्यांना पावन करून घेतले. शिक्षा झाल्याबरोबर काही दिवस मंत्रिमंडळातून काढले परंतु लोकांची स्मरणशक्ती क्षीण असते यावर कॉंग्रेसचा ठाम विश्‍वास आहे. त्या विश्‍वासानुसार काही दिवसांनी लोक शिबु सोरेन यांची शिक्षा विसरले. आता कॉंग्रेसने त्यांचा हात हाती घेतला असून लालू प्रसादांच्या विशेष सहकार्याने झारखंडमध्ये त्यांचे सरकार कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तारूढ झाले आहे. लालू, सोरेन आणि कॉंग्रेस यांची युती होऊनसुध्दा झारखंड विधानसभेतला बहुमतासाठीचा जादुई आकडा गाठला जात नव्हता. त्यासाठी आणखी काही आमदारांची गरज होती. ती गरज मधु कोडा यांनी पुरी केली. त्याला जवळ करताना कॉंग्रेसने ते पुरते भ्रष्ट आहेत की नाही याची खात्री करून घेतली. भ्रष्टाचाराच्या सार्‍या कसोट्यांना ते शंभर टक्के उतरत आहेत याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या प्रभावाखालील सहा आमदारांचा पाठिंबा घेतला.

अशा रितीने झारखंडमध्ये आता शंभर टक्के भ्रष्टाचारी सरकार सत्तेवर आहे. तरीही राहुल गांधींचा भ्रष्टाचार मुक्तीचा दावा जारीच आहे. आता तर मधु कोडा सारखा भ्रष्ट माणूस केवळ बाहेरून पाठिंबा देतो ही गोष्ट कॉंग्रेसच्या नेत्यांना सहन होईना. इतका छान भ्रष्टाचारी माणूस पक्षात आला तरच पक्षाची खरी शान वाढणार आहे. असे त्यांच्या मनाने घेतले आहे. म्हणून भ्रष्टाचार मुक्तीचे आद्य प्रणेते, लोकपाल बिलाचे जनक माननीय राहुल गांधी यांच्या खास आशीर्वादाखाली मधु कोडा यांना गंगाजल शिंपडून कॉंग्रेस पक्षात पावन करून घेण्यात येणार आहे. मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांनी तशी घोषणा केली आहे. लोकांची स्मरणशक्ती क्षीण असते म्हणून मधु कोडा यांच्याविषयी लोकांच्या स्मरणातून गेलेली काही माहिती या ठिकाणी देणे प्रस्तुत वाटते. त्याशिवाय कॉंग्रेस पक्ष किती शुध्द हे लोकांच्या लक्षात येणार नाही. मधु कोडा झारखंडाच्या मंत्रिमंडळात खाण मंत्री होते. या अधिकारात लोकांकडून पैसे घेऊन खाणीचे वाटप करून २५०० कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केल्याच्या आरोपावरून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. मधु कोडा यांनी केलेला खाण घोटाळा हा देशातला सर्वात मोठा खाण घोटाळा आहे. त्यावरून त्यांच्यावर पाच कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांनी ४४ महिने न्यायालयीन कोठडीत राहण्याचा विक्रम केला. अशा गैरमार्गाने मिळालेल्या पैशातून त्यांनी अपक्ष असूनसुध्दा मुख्यमंत्रीपद प्राप्त केले होते. मधु कोडा यांचे कॉंग्रेसमध्ये हार्दिक स्वागत आहे.

Leave a Comment